सलमान खान धमकी प्रकरण, चाहत्याने खोडसाळपणा केल्याची शक्यता

माझे वडील दररोज सकाळी व्यायाम आणि जॉगिंग करण्यासाठी ज्या ठिकाणी जातात, तिथे त्यांचे बसण्याचे ठिकाण ठरलेले असते. माझ्या बऱ्याच चाहत्यांना ही गोष्ट माहीत असल्यामुळे अनेक चाहते त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी अथवा आम्ही किती मोठे चाहते आहोत हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी चिठ्ठी ठेवतात. ती चिठ्ठी सुरक्षारक्षक उचलून वडिलांना देतात आणि वडील चाहत्यांचा निरोप माझ्यापर्यंत पोहचवतात, परंतु पहिल्यांदाच याप्रकारची धमकीची चिठ्ठी आली आहे, असे बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खान याने वांद्रे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

( हेही वाचा : शाळेपासून १०० मीटर आवारात फेरीवाल्यांवर बंदी )

सलमान खानचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या चिठ्ठीशी माझा काही संबंध नसल्याचे लॉरेन्स बिष्णोई याने स्पष्ट केल्यामुळे हा चाहत्याने केलेला खोडसाळपणा असावा का असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

रविवारी सकाळी वांद्रे बँडस्टँड येथे व्यायाम आणि जॉगिंगसाठी गेलेले सलमान खान याचे वडील आणि चित्रपट लेखक सलीम खान यांना नेहमी प्रमाणे बाकड्यावर चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीत त्यांना आणि सलमान खान या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

खोडसाळपणा केला असण्याची शक्यता

या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सलीम खान, त्यांच्या २ सुरक्षारक्षकांसह सलमान खान या चौघांचा जबाब नोंदवून घेतला आहे. सलमान खान याने आपल्या जबाबात त्याला अलीकडे कुणाकडून कुठलीही धमकी, अथवा मेसेज आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वडील ज्या ठिकाणी जॉगिंगला जातात त्या ठिकाणी असलेल्या नेहमीच्या बाकड्यावर ते थोडा वेळ बसतात, वडील येण्यापूर्वी माझे अनेक चाहते माझ्यासाठी तिकडे चिठ्ठी सोडतात त्यामार्फत ते मला शुभेच्छा देणे, माझ्या कामाचे कौतुक करणे, मी तुमचा किती मोठा चाहता आहे यासारख्या चिठ्ठ्या लिहून ठेवतात. वडील त्या चिठ्ठ्या वाचून चाहत्यांनी काय काय लिहले आहे, हे मला घरी येऊन सांगत असतात असे सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्राप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची तिहार तुरुंगात चौकशी करण्यात आली आहे. हे धमकीचे पत्र पाठवण्यात आपला काहीही हात नसल्याचे लॉरेन्स बिश्नोई याने स्पष्टपणे सांगितले आहे. याआधी सलमानला मारण्याचा कट रचला होता पण यावेळी त्याला धमकावण्यात आपला हात नव्हता, असे लॉरेन्सने सांगितल्यामुळे हे चिठ्ठी नेमकी कोणी लिहिली याचा शोध घेतला जात असला तरी एखाद्या चाहत्याने किंवा सलमान खान पासून नाराज असलेल्या व्यक्तीने हा खोडसाळपणा केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here