आंबेडकर अनुयायांसाठी ‘या’ भागातील महिलांनी बनवल्या १६,६५० चपात्या

94

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना मोफत भोजनाची व्यवस्था समता परिषदेच्यावतीने केली जाते. या समता परिषदेच्या अन्न वाटपात चपात्या बनवून देण्यासाठी तेथील अन्नछत्रात माटुंगा सुंदर कमला नगरमधील महिलांनी सहभाग नोंदवला. सर्व महिलांनी तब्बल १६ हजार ६५० चपात्या बनवून शिवाजीपार्क येथील समता परिषदेच्या स्टॉल्सवर मोफत उपलब्ध करून देत अनुयायांच्या सेवेत आपलेही योगदान दिले.

(हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले, ‘इंदू मिलमधील स्मारक…’)

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे चैत्यभूमीवर अभिवादन करणाऱ्या अनुयायांना अन्न तसेच खाद्यपदार्थांचे वाटप विविध सेवाभावी संस्था तसेच संघटनांकडून केले जाते. याठिकाणी मागील अनेक वर्षांपासून समता परिषदेच्यावतीने अन्न वाटपाचा स्टॉल्स लावला जातो. त्यामुळे या स्टॉल्सवर चपात्या उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महिला विभागातील अन्नछत्रात दाखल होऊन चपात्या बनवून देत असतात.

माटुंगा येथील सुंदर कमला नगर येथे भाजपचे दक्षिण मध्य विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर व स्थानिक भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी अन्नछत्र बनवून तिथून १६ हजार ६५० चपात्या बनवून समता परिषदेच्या स्टॉल्सवर सोपवल्या. विशेष म्हणजे माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही स्वत: चपात्या बनवण्यात हिरीरीने भाग घेतला.

भाजपचे दक्षिण मध्य लोकसभा विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना भोजनाचे वाटप करण्यासाठी समता परिषदेच्यावतीने लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर गेल्या सात वर्षांपासून स्थानिक महिलांना सोबत घेऊन चपात्या बनवून दिल्या जातात. या अन्नछत्राकरता अतिशय चांगल्याप्रकारे महिला मदत करत असतात. या सर्व महिला स्वत:च्या घरचा स्टोव्ह,पोळपाट लाटणे घेऊन येत दिवसभर चपात्या बनवतात. या सर्व महिलांनी बनवलेल्या चपात्या विशिष्टप्रकारे बांधून शिवाजीपार्क येथील समता परिषदेच्या स्टॉलवर  दिल्या जातात. याशिवाय अन्य बाहेरुनही काही चपात्या मागवल्या जातात. अशाप्रकारे सोमवारी दिवसभरात १६,६५० चपात्या समता परिषदेच्या स्टॉलवर देण्यात आल्या, असे शिरवडकर यांनी सांगितले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.