सांगली शहरात सूत गिरणीतील संकुलात वास्तव्य केलेल्या सांबरला पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर वनविभागाने बुधवारी पहाटे मोठ्या शिताफीने पकडले. सांबारचा कृत्रिम अधिवास तयार करुन एका कोप-यात वाहन उभे करुन स्वतःहूनच त्याला वाहनापर्यंत आणण्याची क्लुप्ती वनाधिका-यांनी लढवली. बोमा तंत्रज्ञान या नावाने प्रसिद्ध असलेल्या या पद्धतीला दक्षिण आफ्रिका आणि देशात मध्य प्रदेशात बारसिंगा आणि चितळ यांना पकडण्यासाठी वनाधिकारी वापरतात. पाच दिवसांच्या संयमानंतर वनाधिका-यांना सांबरला कोणतीही दुखापत न होता यशस्वीरित्या पकडण्याचे तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरले. वर्षभरात दुस-यांदा बोमा तंत्रज्ञान वापरुन सांगलीत वन्यप्राणी शहरातून नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
( हेही वाचा : महसूल विभाग लाचखोरीत नंबर १ तर पोलीस खाते दुसऱ्या क्रमांकावर )
नेमकी घटना काय
२ डिसेंबरला सांगलीतील मिरज येथील एमआयडीसी येथे सांबर स्थानिकांना दिसून आले. याबाबत माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांबराला पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सांबराला लोकांचा त्रास होऊ नये म्हणून वनाधिका-यांनी त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर पहारा देण्यास सुरुवात केली. सांबर नजीकच्या रानात काही तास थांबला. रात्री त्याने थेट सांगली शहरात प्रवेश केला.
शहरात पाच दिवसांचा मुक्काम
सांगली शहरांतील पालिकेच्या पाणी पुरवठा केंद्रातील कुंपणात आणि त्यानंतर सूत गिरणीतील ३० एकर कुंपणात सांबर चक्क चार दिवस राहिला. या दिवसांत त्याला यशस्वीरित्या पकडण्याची वनाधिका-यांनी योजना तयार केली. सांबराची विश्रांती करण्याचे ठिकाण, टेहाळण्याच्या ठिकाणांचा तीन दिवस अभ्यास केल्यानंतर ६ डिसेंबरला सांबरला बोमा पद्धतीने पकडण्याचा निर्णय वनाधिका-यांनी घेतला.
चार दिवसांत सांबरची येजा असलेल्या वाटेवर वनाधिका-यांनी चारा, ज्वारीच्या पिकाची धाटं आदी खाद्य आणून ठेवले. परिसरात पाण्याची विहीर असल्याने सांबाराची खाण्या-पिण्याची व्यवस्था झाली होती. ६ तारखेला दुपारी ४ वाजल्यापासून पहाटे एक वाजेपर्यंत बोमा पद्धतीने व्ही आकाराचा अधिवास वनाधिका-यांनी तयार केला. एका मोकळ्या बाजूने सांबार आल्याने ८फूटांच्या हिरव्या जाळीसह आजूबाजूच्या चा-यामुळे त्याला जंगलाचा भास झाला. टोकाच्या बाजूला असलेल्या गाडीत त्याने शिरकाव केला नाही. ८ फूटांच्या जागेवरुन त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १५ फूटांचे व्ही आकाराची जागा उभारल्यानंतर आजूबाजूला अधिवास दिसून येण्यासाठी आजूबाजूला चारा टाकला. यावेळी पहाटेच्यावेळी सांबर स्वतःहून वाहनापर्यंत चालत आले.
सांगली वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे चार वर्षांच्या सांबारची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून, बुधवारी सायंकाळीच त्याला नैसर्गिक अधिासात सोडले जाईल, असेही ते म्हणाले.
सांगली शहरातील शेतात तयार होतोय अधिवास
सांगली जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्यात तृणभक्षक प्राणी आढळतात. अभयारण्यातून काही प्राण्यांची ये-जा सुरु असते. शहरातील दंडोबा वनक्षेत्र तसेच नेरले आणि कडेगाव येथेही सांबरचा कळप आढळतो. त्यातूनच एखादा सांबर आला असावा, असा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community