कुपोषण, गरिबी, निष्क्रियता अशी वर्षानुवर्षे आदिवासींची ओळख आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यामध्ये सरकार कमी पडते. त्यामुळे त्यांची ही ओळख पुसून टाकणे सहजासहजी शक्य होत नाही. मात्र ‘संपूर्ण बांबू केंद्रा’ने ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आदिवासी आणि बांबू हे समीकरण आहे. मात्र बांबूच्या माध्यमातून केवळ टोपल्या बनवण्याव्यतिरिक आदिवासी कोणतेही उत्पादन काढत नाहीत. परंतु संपूर्ण बांबू केंद्राने सुमारे दीडशे प्रकारची उत्पादने निर्माण करणे सुरु केले, त्याचाच एक भाग म्हणून बांबूच्या माध्यमातून राख्यांचे उत्पादन केले जात आहे. या राख्या दरवर्षी सातासमुद्रापलीकडे पाठवल्या जात आहेत. त्यातून आदिवासी आर्थिक समृद्धीच्या दिशेने जात आहेत.
पंतप्रधान मोदींनीही बांधली राखी
जिल्हा अमरावती, मेळघाट येथील लवादा गावामध्ये आदिवासी मागील २५ वर्षांपासून बांबूच्या माध्यमातून राख्यांचे उत्पादन करत आहेत. संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून येथील २५० गावांतील तब्बल १ हजारांहून अधिक आदिवासी हे बांबूच्या माध्यमातून राख्यांचे उतपादन करत आहेत. यंदाच्या वर्षी एक लाखाहून अधिक संख्येने राख्यांचे उत्पादन होणार आहे. त्यातील हजारो राख्या ह्या सातासमुद्रापलीकडे पाठवल्या जाणार आहेत. या राख्या स्वतः आदिवासी कलाकुसरीने बनवतात आणि त्या ऑनलाइन परदेशातही पाठवल्या जातात. २०१८ साली या आदिवासींनी बनवलेली राखी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधली होती.
(हेही वाचा ट्रेनच्या तिकिटांवर असणाऱ्या RAC, RSWL, CNF या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?)
२५ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेली
२५ वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे आणि डॉ. निरुपमा देशपांडे हे दाम्पत्य नोकरी व्यवसाय सोडून थेट मेळघाटातील लवादा येथे राहायला गेले. तिथे आदिवासी बांधवांना बांबूच्या माध्यमातून विविध उत्पादने कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले आणि त्यानुसार आजमितीस या भागात हजारो आदिवासी ही उत्पादने बनवून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होत आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या भागात राख्यांच्या माध्यमातून ८० ते ९० लाख रुपयांचे पैसे जमा होतात, तो सगळा पैसा याच आदिवासींना दिला जातो. या राख्यांना आता मागणी वाढत आहे. मागील वर्षी जपान येथून एका कुटुंबाने भारतीय जवानांना बांबूच्या सहाय्याने बनवलेल्या राख्या पाठवण्यासाठी २० हजार रुपये पाठवले होते, अशी आठवण संपूर्ण बांबू केंद्राचे सतीश घाणेकर यांनी सांगितली.
Join Our WhatsApp Community