सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक यांचे वडील विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नागोठणे येथील त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात् मुलगा अभय वर्तक, तसेच देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या स्नुषा रूपाली, कन्या श्रावणी फाटक, जावई कौस्तुभ फाटक, नातू योगेश्वर आणि नात कल्याणी असा परिवार आहे. नाना वर्तक यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनमिळावू व्यक्तिमत्व
नाना वर्तक यांच्या निधनाने नागोठणे येथील सर्व समाज घटकांकडून दुःख व्यक्त होत आहे. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ, सज्जन आणि तितकेच हिंदू धर्माच्या प्रती अभिमान असलेले नाना वर्तक यांचे समाजातील सर्व समजघटकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे नागोठणे येथील पंचक्रोशीत ते बरेच परिचित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रायगड जिल्हा सह संपर्क प्रमुख किशोर जैन यांनी यासंबंधी बोलताना, ‘एका निष्ठावंत हिंदुत्वाची विचारसरणी स्वतःच्या जीवनात, संपूर्ण कुटुंबात, तसेच जनसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रसंगी संघर्षसुद्धा करणार्या अत्यंत सरळ स्वभावाच्या व्यक्तीमत्त्वाचा अंत झाला. मी स्वतः माझ्या सार्वजनिक जीवनात वर्तक कुटुंब आणि नाना यांचे योगदान कधीच विसरणार नाही. जय श्रीराम!’, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सनातन संस्थेच्या स्थापनेपासून नाना वर्तक हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अध्यात्मिक प्रगतीसाठी साधना करत होते. सोबत हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सक्रिय होते.
डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेल्या खोलीचे जतन
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले नागोठणे (रायगड) येथील घर हे विजय (नाना) वर्तक यांचे निवासस्थान होय. डॉ. आठवले यांचा जन्म झालेल्या खोलीचे नानांनी भावपूर्णपणे जतन केले आहे. नाना वर्तक हे वर्ष १९९२ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या विविध उपक्रमांमध्येही सहभागी होत असत. ते राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात दैनिक सनातन प्रभातमध्ये लिखाण करत असत.
Join Our WhatsApp Community