सांगलीत भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

180

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील कासेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही कार पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हे कुटुंब कारमधून पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. कराड तालुक्यातून पुढे काही अंतरावरच्या कासेगावजवळ हा अपघात झाला. येवलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरला पाठीमागून एमएच १४ डीएन ६३३९ हा क्रमांक असलेली कार जोरात धडकली. या अपघातात अरिंजय अण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरू अभिनंदन शिरोटे यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा – चित्रा वाघ म्हणाल्या, “अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणताय, एकट्यानेच तुम्हा तिघांचा …”)

गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सीटचा भागही तुटलेला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत कासेगाव पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ०५ एएम ३६४४) थांबलेला होता. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कारने (एमएच १४ डीएन ६३३९) उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.