नॅशनल पार्कला पाहिजे साठीपार पशुवैद्यकीय अधिकारी

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जून महिन्यात वाघाटीच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा प्राण्यांवरील उपचार आणि मनुष्यबळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून उद्यानात पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारी नसताना आजारी प्राणी, छोटे बछडे तसेच वयोवृद्ध प्राण्यांना सांभाळायला साठीपार पशुवैद्यकीय अधिका-यांचीच गरज असल्याची जाहिरात उद्यान प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला केवळ राष्ट्रीय उद्यानातच अगोदर पशुवैद्यकीय अधिका-याचे काम केलेल्या माजी पशुवैद्यकीय अधिका-याने अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

राज्यातील सहा महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांएवढाच दर्जा असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पिंज-यात सहा वाघ, दोन सिंह, सतरा बिबटे, तीन बिबट्यांचे बछडे, दोन वाघाटी, नीलगाय, काळवीट, सांबार तसेच हरिण, चौशिंगा, मोर असे अंदाजे ८५ प्राणी -पक्षी पिंज-यात सांभाळले जातात. त्यापैकी बिबटे वगळता इतर प्राण्यांकडून वनविभाग पर्यटनाच्या माध्यमातून पैसाही मिळवते. वनराणी बंद असल्याने मिनी झू मधील हरिण आणि पक्षी पाहण्यासाठी पर्यटक रुळ ओलांडून पर्यटनाचा आनंद घेत आहेत. परंतु या वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी गेल्या महिन्यात नागपूर येथील वनविभागाच्या मुख्य कार्यालयातून परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकात केवळ साठीपार आणि पस्तीशी न ओलांडलेल्या पशुसंवर्धन विभागातील अधिका-यांनाच उद्यानात नियुक्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले. परिपत्रक जाहीर होताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने पशु वैद्यकीय पदाच्या रिक्त पदासाठी वयाच्या अटीसह इतर शर्थींसह जाहिरात प्रसिद्ध केली. २७ जुलै ही पशुवैद्यकीय पदासाठी उद्यानात अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. गेल्या वर्षीच पशुसंवर्धन विभागातून निवृत्त झालेल्या व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या पशुवैद्यकीय अधिका-याने अर्ज केल्याचे सूत्रांकडून समजले.

(हेही वाचा Alert! तुमच्या मोबाईलमध्ये हे 13 Apps आहेत, तर लगेच Delete करा; अन्यथा…)

२०१३ सालापासून प्राण्यांच्या जगण्यावर गदा

उद्यानात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून पूर्णवेळ काम केलेल्या मागील दोन पशुवैद्यकीय अधिका-यांच्या कामकाजावर प्रचंड वाद झाला. नागपूरहून उपचारासाठी आणलेल्या वाघिणीचा सहा महिन्यांच्या आतच उद्यानात झालेला मृत्यू, बिबट्यांचे लागोपाठ होणारे मृत्यू, बिबट्यांवरील विषप्रयोग, जाड झालेल्या वाघिणीला गर्भवती म्हणून जाहीर करणे अशा विविध कारणांनी उद्यानातील वन्यप्राण्यांच्या उपचारांबाबत सातत्याने शंका उपस्थित केली जात आहे.

वन्य प्राण्यांच्या बचावकार्यात म्हाता-या पशुवैद्यकीय अधिका-याचीही कसोटी

मुंबई व महानगर परिसरातील नागरी वसाहतीत बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी शिरल्यास त्याला पकडून जेरबंद करण्याचे काम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राणी बचाव पथक करते. या कामात कित्येकदा वन्यप्राण्याचा वनाधिका-यांवर हल्लाही होतो. प्राण्याला पकडण्यापूर्वी बेशुध्द करण्यासाठी बंदुकीत योग्य मात्रेत बेधुद्धीचे इंजेक्शन भरण्याचे महत्त्वाचे काम पशु वैद्यकीय अधिका-याचे असते. म्हाता-या पशुवैद्यकीय अधिका-याची कार्यक्षमता कमी होत असताना वन्यप्राणी पकडण्यात जीवघेणा प्रकारही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here