मुंबई पोलीस दलातून मोठी बातमी समोर येत असून पोलीस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नगराळेंच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. नगराळे यांच्यावर महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – ‘या’ ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक)
राज्य सरकारने संजय पांडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर, हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली आहे.
Sanjay Pandey has been appointed as new Mumbai Commissioner of Police; outgoing Mumbai CP Hemant Nagrale transferred: Maharashtra Govt pic.twitter.com/fg3Qp4NsUq
— ANI (@ANI) February 28, 2022
राज्याचे पोलीस महासंचालकपदी असलेल्या संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दल आता संजय पांडे यांच्या नेतृत्त्वात काम करेल. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता दुसरी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त केले आहे.
जाणून घ्या हेमंत नगराळे यांच्याबद्दल
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असून 1987 च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही आपली सेवा बजावली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. तर 1992 ते 1994 या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. 1992च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती उत्तमरीत्या हाताळली आहे. 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं.
1996 ते 1998 मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी आणि गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली. 1998 ते 2002 या काळात नगराळे यांनी सीबीआयसाठी मुंबई आणि दिल्लीतही आपली सेवा बजावली आहे. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोण आहेत संजय पांडे?
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी एप्रिल 2021 मध्ये पोलीस महासंचालकपदाची सूत्रे सांभाळल्यापासून काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामध्ये महिलांची ड्युटी 8 तास करण्याचा निर्णय हा अतिशय धाडसी निर्णय मानला जात आहे.
Join Our WhatsApp Community