संजय राऊत प्रकरणी ED ची मुंबईत 3 ठिकाणी छापेमारी

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणी अजून वाढल्याचे दिसत आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात राऊतांना अटक करण्यात आली असून सध्या ते ईडीच्या ताब्यात आहेत. दरम्यान एकीकडे ईडीकडून राऊतांची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे राऊतांशी संबंधित तीन ठिकाणी ईडीची शोध मोहीम सुरू आहे. या शोध मोहिमेदरम्यान, बरीच माहिती मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर ईडीने छापे मारले होते. त्यानंतर त्याच दिवशी ईडीकडून दादरच्या गार्डन कोर्ट इमारतीतील राऊतांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. यासह गोरेगाव येथेही ईडीने छापे मारून शोध मोहीम सुरू करण्यात आले होते. यावेळी चौकशीनंतर राऊतांना अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांना ईडीच्या कोर्टात हजर करण्यात आले असताना त्यांना ३ दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. या कोठडीनंतर राऊतांची पुन्हा चौकशी सुरूच असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, राऊतांची चौकशी सुरू असतानाच मंगळवारी राऊतांच्या संबंधित मुंबईतील दोन ते तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा – ED पुन्हा अ‍ॅक्शनमोडमध्ये! नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा)

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून छापेमारी 

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या पथकाने दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर छापा टाकल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात हजर झाले असून त्यांनी त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी यापूर्वी सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली असून मनी लाँड्रिंग प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या शोधात ईडीने नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर हे छापे टाकले आहे. या दरम्यान 10 जनपथवर झालेल्या बैठकीच्या कागदपत्रांचाही शोध घेतला जात असून तपासणी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या ठिकाणांसह लोकांवर छापेमारी होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here