अवघ्या तीन दिवसांत ससाणे यांचे बदली आदेश रद्द, कांदिवली विभागाच्या सहायक आयुक्त पदी ललित तळेकर

114
महापालिकेच्या एच- पूर्व प्रशासकीय विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांची बदली कांदिवली आर- दक्षिण विभागात करण्यात आल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांमध्ये या बदलीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. ससाणे यांची नियुक्ती झालेल्या कांदिवली आर- दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी घनकचरा व्यवस्थापनाचे परिमंडळ सात चे अधिकारी ललित तळेकर यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बदली आदेश रद्द करण्याचा दबाव आयुक्त तथा प्रशासकांवर येत असऱ्याचे स्पष्ट होत आहे.
मागील तीन दिवसांपूर्वी म्हणजे ११ नोव्हेंबर २०२२ रोजी वांद्रे पूर्व ते सांताक्रुज पूर्व या (एच -पूर्व) प्रशासकीय विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, कांदिवली (आर- दक्षिण) विभागाच्या संध्या नांदेडकर आणि सहाय्यक आयुक्त स्वप्नजा शिरसागर यांच्या बदल्या अनुक्रमे (आर- दक्षिण) (आर- मध्य) आणि (एच-पूर्व)  प्रशासकीय विभागात करण्यात आल्या होत्या. या नियुक्तीचे आदेश निघाल्यानंतर सुट्टीचे दोन दिवस वगळता सोमवारी कार्यालयीन दिवशी अलका ससाणे यांचे बदली आदेश रद्द करण्यात आले आणि त्यांच्या जागी ललित तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ससाणे यांची बदली यापूर्वीच केली जाणार होती परंतु ही बदली उशिरा झाल्यानंतरही त्यांना त्यांचे बदली आदेश रद्द करून त्यांना पदाविना ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांच्या कारकिर्दीत अलका ससाणे या एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त असताना त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीनंतर त्याची बदली केईएम रुग्णालयात करण्यात आली होती. तिथे काही महिने सेवा बजावल्यानंतर ससाणे यांची बदली भायखळा ( ई) विभागाच्या सहायक आयुक्त पदी करण्यात आली होती. तिथून त्यांची बदली एच पूर्व विभागात करण्यात आली होती. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे कुर्ला एल विभागाच्या सहायक आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु ससाणे यांच्यावर शिवसेनेचा छाप असल्याने त्या कांदिवली विभागात जिथे भाजपचे प्राबल्य आहे, तिथे किती दिवस टिकतात हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण नियुक्तीच्या तीनच दिवसात आणि पदभार स्वीकारताच त्यांचे बदली आदेश रद्द करण्यात आले आहेत.
यापूर्वीच्या आर- दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त असलेल्या संध्या नांदेडकर यांच्या विरोधात भाजपाचे एक आमदार होते आणि त्यांचे सरकार आल्यापासून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करत होते. त्यानुसार काही महिन्यात नांदेडकर यांची बदली झाली. पण आमदारांच्या मर्जीतील अपेक्षित अधिकाऱ्याची वर्णी न लागल्याने ससाणे यांचे आदेश रद्द करून संबंधित अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र ससाणे यांना एच- पूर्व विभागातून बाजूला करण्यासाठीच त्यांची बदली आर -दक्षिण विभागात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हेच आदेश रद्द करत आर-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त पदी ललित तळेकर यांची बदली करत ससाणे यांना पदाशिवाय ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.