साता-यात बिबट्यांच्या जोडीवर थर्मल ड्रोनची नजर

साता-यातील ऊसाच्या शेतात बिबट्यांचा अधिवास कायम होत असताना, या भागांत बिबट्याचे मानवावर होणारे हल्लेही वाढू लागले आहेत. वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी गडचिरोली आणि चंद्रपूर पाठोपाठ वनविभागाने आता साता-यातही बिबट्यांच्या वावरावर थर्मल ड्रोनने नजर ठेवायला सुरु केली आहे. पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेच्या मदतीने साता-यातील जिनती गावाच्या डोंगरात वावरणा-या बिबट्याच्या जोडीवर वनाधिका-यांनी थर्मल ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

माणसांवर हल्ला होऊ नये यासाठी बिबट्यांच्या जोडीचा वावर कुठे सुरु आहे, याबाबत वनविभाग बिबट्याच्या जोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सातारा येथील डोंगरात वाळलेले गवत कापताना अचानक नजीकच्या परिसरातून गावक-यांना प्राण्यांचे विचित्र आवाज ऐकू यायला लागले. गावक-यांनी ही बाब तातडीने वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. जिनती गावातील खासगी डोंगराळ भागांत कोणता प्राणी आलाय, याचा शोध घेण्यासाठी सुरुवातीला वनविभागाने साधा ड्रोन वापरला. ड्रोनच्या वापरातून डोंगराळ भागांतील चित्रणात वन्यप्राण्याबाबत नेमकी माहिती आली नाही. अखेरीस रेस्क्यूच्या मदतीने थर्मल ड्रोनच्या चित्रणातून डोंगरात बिबट्याची जोडी राहत असल्याचे वनाधिका-यांच्या लक्षात आले. जानेवारी ते सप्टेंबर महिना बिबट्याचा मिलन काळ असल्याने सध्या त्यांचा वावर असलेल्या भागांत गावक-यांनी भेट देणे टाळावे, असे आवाहन वनाधिका-यांनी केले. गावातील पोलिस पाटील, सरपंच यांच्याशी वनाधिका-यांनी बैठक घेतली. बिबट्याकडून हल्ले होऊ नये म्हणून त्यांच्या मिलनकाळात लोकांनी डोंगराळ भागाला भेटी देणे टाळावे, असे आवाहन सातारा वनविभाग (प्रादेशिक)चे कराड परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्रपाल तुषार नवले यांनी सांगितले.

( हेही वाचा: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहचले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ किस्सा )

साता-यात ‘या’ भागांत सुरु आहे मानव-प्राणी संघर्ष

सातारा, कराड आणि पाटण तालुक्यात गेल्या काही वर्षांत बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. ऊसाच्या शेतात बिबट्यांचा अधिवास तयार होत आहे. कृष्णा आणि कोयना नदीमुळे येथे बारामाही ऊस पिकतो. ऊसाच्या शेतात बिबट्यांचे मिलन, बछड्यांचा वावर आता सर्रास आढळून येत आहे. गेल्या वर्षी साता-यात पाचवेळा बिबट्याने माणसावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा बळीही गेला. साता-यात वाढता संघर्ष टाळण्यासाठी थर्मल ड्रोनची मदत लोकांना सावध करु शकते. ऊसाच्या अधिवासात बिबट्यांचे मिलन वर्षभर दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी परिसरात वावरताना सावधानता बाळगावी तसेच वनाधिका-यांना जंगलातील संशयास्पद हालचालींबाबत माहिती द्यावी, असे आवाहन सातारा वनविभागाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here