यंदाच्या वर्षापासून मुंबईच्या ठाणे खाडी किनारपट्टीला हिवाळ्यात भेट देणा-या सहा फ्लेमिंगो पक्ष्यांना सॅटलाईट टॅगिंग केले गेले. त्यापैकी एका फ्लेमिंगो पक्ष्याने पावसाचा जोर वाढताच आकाशात उंच भरारी घेत थेट गुजरात राज्य गाठले. फ्लेमिंगो पक्ष्याच्या भ्रमणमार्गाची माहिती घेण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ही पर्यावरणप्रेमी संस्था सहा फ्लेमिंगो पक्ष्यांवर सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून मागोवा घेत आहे. या सहा फ्लेमिंगो पक्ष्यांपैकी ‘हुमायून’ असे नाव मिळालेल्या पक्ष्याने २८ जून रोजी ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याला अलविदा केला.
दरवर्षाला हिवाळ्यात फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबई किनारपट्टीला भेट देतात. पावसाचे आगमन होताच चार महिन्यांसाठी फ्लेमिंगो पक्षी परतीच्या मार्गाला लागतात. ग्रेटर आणि लेसर या दोन प्रमुख फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रजाती चार महिन्यांसाठी नेमके कुठे जातात, याबाबत अद्यापही खात्रीलायक माहिती जाणून घेण्यासाठी सॅटलाईट टॅगिंगचा प्रकल्प राबवला जात आहे. त्यापैकी तीन फ्लेमिंगो पक्ष्यांना भांडुप पम्पिंग स्टेशन आणि उर्वरित तीन फ्लेमिंगो पक्ष्यांना नवी मुंबईतील पाम बीच येथून सॅटलाईट टॅगिंग केले गेले.
गेले सहा महिने सहा फ्लेमिंगो पक्षी नजीकच्या भागांतच स्वच्छंदीपणे संचार करत होते. जूनच्या अखेरिस पावसाचा जोर वाढल्यानंतर ‘हुमायुन’ नावाच्या लेसर फ्लेमिंगो पक्ष्याने आपला मुक्काम हलवल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. बीएनएचएसचे उपसंचालक डॉ राहुल खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार,’ हुमायून’ने २८ जूनला ठाणे खाडी सोडली. ३० जून रोजी हुमायून गुजरात राज्यातील भावनगर येथे पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून हुमायून भावनगर येथील पाणथळ जमीन भागांतच फिरतोय. भावनगर विमानतळ आणि बंदरादरम्यान मिठागरांतील पाणथळ जमिनीला ‘हुमायून’ने सध्या मुक्कासाठी पसंत केल्याचे सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून आढळून आले.
हुमायून फ्लेमिंगो २८ जून रोजी रात्री १० वाजून २८ मिनिटांनी ठाणे खाडीतून निघाला. ३० जूनला गुजरात राज्यातील भावनगर येथे संध्याकाळी सहा वाजून १३ मिनिटांनी पोहोचला. – डॉ राहुल खोत, उपसंचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
२८ जून रोजी ठाणे खाडी सोडल्यानंतर दोन दिवसांच्या प्रवासात ‘हुमायून’ने दोन ठिकाणी विश्रांती घेतली. त्यापैकी एक जागा राज्यातील उत्तर कोकण किनारपट्टीजवळ होती. त्यानंतर गुजरात राज्यात प्रवेश करताना ‘हुमायून’ किनारपट्टीतील आकाशातूनच प्रवास करत होता. गुजरातच्या वापीनजीकच्या समुद्रकिना-यातून किनारपट्टीच्या प्रवासाची सरळ रेषा संपली. त्यानंतर ‘हुमायून’ने समुद्रामार्गे प्रवास सुरु केला. सुरतजवळील समुद्र किनारा गाठल्यानंतर ‘हुमायून’ तिथे थांबला. पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास करत ‘हुमायून’ भावनगर परिसरात पोहोचला.
Join Our WhatsApp Community