ऑलिव्ह रिडले कासवांपैकी ‘प्रथमा’चा मुंबई किनाऱ्याजवळ मुक्काम

राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलेल्या पाच मादी ऑलिव्ह रिडले कासवांपैकी प्रथमा या पहिल्याच सॅटलाईट टॅगिंगचा मान मिळवलेल्या कासवाने सध्या मुंबई किनाऱ्याजवळ मुक्काम केला आहे. ही माहिती वनविभागाच्या कांदळवन कक्षाने जाहीर केली. प्रथमा मुंबई किनाऱ्यापासून ११५ किलोमीटर लांब आहे. तब्बल दोन महिन्यानंतर प्रथमा गुजरातचा समुद्रकिनारा सोडून राज्यात परतली.

( हेही वाचा : ‘परशुराम घाट’ रोज ६ तास बंद राहणार! जाणून घ्या ‘कोकणात’ जायचे पर्यायी मार्ग… )

भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर सुरेशकुमार यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प सुरु आहे. डॉ. सुरेशकुमार यांच्या माहितीनुसार, प्रथमा राज्याच्या दक्षिण दिशेकडील आपला प्रवास पुढेही कायम ठेवेल. उर्वरित तीन मादी ऑलिव्ह रिडले कासवांपैकी वनश्री आणि सावनीला आपल्या मूळ टॅग केलेल्या जागेजवळील किनारेच महिन्याभरापासून जास्त पसंतीला येत आहेत. दक्षिण कोकणातील दोन्ही किना-यालगत असलेले मुबलक अन्न त्यांना आकर्षित करत असल्यानेच त्या समुद्रातील फारसे अंतर कापत नसल्याचेही डॉ. सुरेशकुमार यांनी सांगितले. त्यापैकी वनश्री ही किनारपट्टीपासून केवळ ५० किलोमीटर लांब समुद्रात फिरत आहे. सावनीलाही केवळ ९० किलोमीटर किनारपट्टीपासून लांब अंतरावर राहणे पसंत आहे.

महिन्याभरापूर्वी कर्नाटक राज्यात पोहोचलेली रेवा गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने खोल समुद्राकडे प्रयाण करत असल्याचे दिसून आले. रेवा कर्नाटक किनारपट्टीपासून २४० किलोमीटर लांब आहे.

लक्ष्मीशी संपर्क तुटल्यातच जमा

लक्ष्मी या दुस-यांदा सॅटलाईट टॅगिंग केलेल्या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचे ट्रान्समीटर कनेक्शन काढल्याची माहिती डॉ. आर शिवकुमार यांनी दिली. तिचा फेब्रुवारी महिन्यात संपर्क तुटला होता. लक्ष्मीचा मृत्यू किंवा ट्रान्समीटरमधील तांत्रिक बिघाडामुळे ती संपर्काबाहेर गेली असल्याचा प्राथमिक अंदाज डॉ. सुरेशकुमार यांनी व्यक्त केला. ती पुन्हा संपर्कात येईल, यासाठी आम्ही दोन महिने प्रतीक्षा केली. मात्र अखेरीस तिच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून संबंधित असलेले ट्रान्समीटर संपर्क काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लक्ष्मीचा मृतदेह किना-यावर वाहून आल्यास याबाबतीत अधिक स्पष्टता येईल. ट्रान्समीटवरमधील बॅटरीची ५०० दिवस पुरेस एवढी क्षमता आम्ही इन्स्टॉलेशनच्यावेळी ठेवली होती. मात्र तांत्रिक बिघाडाचे कारणही नाकारता येत नाही. जगभरातील कासवांचा मृत्यू हे दरवेळी किनारपट्टीवर मृतदेह वाहून आल्यानंतरच समजतो असे नाही. अशी माहितीही डॉ. सुरेशकुमार देतात. काही कासव थेट खोल समुद्रात मृत्यूनंतर बुडतात, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here