राज्याच्या किनारपट्टीवर भेट दिलेल्या चार सॅटलाईट कासवांनी पावसाळा जवळ येत असल्याचे संकेत मिळताच किनारपट्टीजवळचा समुद्र गाठला आहे. अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समोर आलेल्या प्रतिमेतून प्रथमा, सावनी, वनश्री आणि रेवा या चारही मादी ऑलिव्ह रिडले कासव किनारपट्टीहून शंभर किलोमीटर आत समुद्रात फिरत आहेत.
( हेही वाचा : ‘आप’ची भिस्त नाराजांवर)
चार ऑलिव्ह रिडले कासवांवर सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवणा-या भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर सुरेशकुमार यांच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली. पावसाळा सुरु होताच नदीतून वाहणारे पाणी थेट समुद्रात येते. नदीतील पाणी समुद्रात मिसळण्याच्या ठिकाणी कासवांना ब-याच प्रमाणात अन्न मिळते. मुबलक प्रमाणात अन्न मिळत असल्याने कासवांनी मुक्काम किनार-याजवळ ठेवला आहे. बराच काळ कासव या भागांतून परतणार नाही, अशी शक्यताही शास्त्रज्ञ डॉ. आर सुरेशकुमार यांनी व्यक्त केली.
नदी मिळत असलेल्या समुद्राच्या मुखाशी कित्येक सागरी जीव अंडी घालायला येतात. त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांना त्यांचे आवडते खाद्यही ब-याच प्रमाणात मिळणार असल्याने चारही कासव पावसाळ्यात किनारपट्टीजवळ राहतील. खेकडे, छोट्या आकाराचेही मासे ऑलिव्ह रिडले कासव आवडीने खातात. राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर ओडिशा राज्यातील किनारपट्टीला भेट देणा-या ऑलिव्ह रिडले कासवाला सॅटलाईट टॅग केले होते. या कासवांना नारंगी रंगाचा फुगेसदृध आकार असलेले जेली फिश खायला फार आवडायचे. पश्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांबाबतही त्यांना येथील जेली फिश आकर्षित करतील, असे शास्त्रत्र डॉ. आर सुरेशकुमार म्हणाले.
चारही मादी ऑलिव्ह रिडले कासवांची सध्याची ठिकाणे
- रेवा – कर्नाटकातील कारवारपासून ८० ते १०० किलोमीटर अंतरावरील समुद्रात संचार करत आहे.
- सावनी – कर्नाटकातील उडीपीपासून ८० ते १०० किलोमीटर अंतरावरील समुद्रात संचार करत आहे.
- वनश्री आणि प्रथमा – दोन्ही राज्यातील मालवण समुद्रकिना-यापासून ४५ ते ५० किलोमटीर अंतरावर आहेत. प्रथमा मालवण किना-याहून उत्तर दिशेकडील समुद्रात संचार करत आहे.