देशात मान्सूनपूर्व वातावरण निर्माण झालेले असताना समुद्रातील हालचालींनाही सुरुवात झाल्याचे संकेत राज्याच्या किनारपट्टीवर सॅटलाईट टॅगिंग केलेल्या कासवांना मिळाले आहेत. चार महिन्यांपूर्वी राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी ऑलिव्ह रिडले कासवांना समुद्रातील अन्नाच्या शोधासाठी गेल्या मार्गाने फिरावे लागत आहे, त्याचा अभ्यास करता कासवांच्या सध्याच्या समुद्रात फिरण्याचा वेग आणि बदलते मार्ग हे मान्सूनचे आगमन जवळ आल्याचे संकेत देत असल्याचे निरीक्षणाअंती अभ्यासकांकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या १ रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन देणार…)
चार मादी ऑलिव्ह रिडले कासव व त्यांचे स्वभाव, भ्रमणमार्ग याचा वनविभागाचे कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव मंडळाकडून अभ्यास सुरु आहे. प्रथमा, सावनी, वनश्री, रेवा या चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग केल्यानंतर गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील कर्नाटक राज्यातील समुद्रापर्यंत त्यांचा प्रवास दिसून आला. गेल्या पंधऱवड्यापूर्वी गुजरातच्या खोल समुद्रातून महाराष्ट्र किनारपट्टीजवळ पोहोचलेल्या प्रथमा या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने आता दक्षिण कोकण गाठले. तर त्याजवळ फिरणा-या सावनीने आता कर्नाटक राज्यातील समुद्र गाठला. रेवा ही मादी ऑलिव्ह रिडले कासव कर्नाटक समुद्राजवळच आढळून येत असताना आता हळूहळू किनारपट्टीजवळ सरकत आहे. सावनी आणि रेवा एकमेकांपासूनच जवळच्या अंतरावर आहेत. या दोघी कदाचित एकाच ठिकाणी येतील, हा कयास भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ आर. सुरेशकुमार यांनी अगोदरच मांडला होता. प्रथमाही अपेक्षेनुसार सातत्याने दक्षिणेकडील समुद्राच्या दिशेने जात आहे. या तिघी कदाचित एकाच ठिकाणी जमतील, अशीही दाट शक्यता होती.
मान्सूच्या आगमाचे संकेत
समद्रात ज्या ठिकाणी अन्न असते तिथे कासव लांबच्या पल्ल्याचाही प्रवास करुन येतात. प्रथमाने बराच काळ गुजरातच्या किनारपट्टीत वास्तव्य केल्यानंतर राज्याच्या किनारपट्टीत परतण्यासाठी वेगाने प्रवास केला. प्रथमा ही सुरुवातीपासून समुद्रभ्रमंतीत वेगवान आहे. रेवा कर्नाटक राज्यात पोहोचल्यानंतर सुरुवातीला २५० किलोमीटर किनारपट्टीपासून लांब होती. आता हे अंतर १०० किलोमीटर किनारपट्टीच्या अंतरावर येऊन पोहोचले. सावनीनेही कर्नाटक राज्य गाठले.
प्रथमा सध्या देवगड आणि विजयदुर्ग किनारपट्टीपासून ६० किलोमीटर समुद्रात आहे. सावनी आणि रेवा एकमेकांपासून दूर आहेत. मात्र त्यांचे ठिकाण एकाच भागात आहे. दोघीही कारवार आणि उडपी या कर्नाटक राज्यातील समुद्रकिना-यांपासून १०० किलोमीटर आत आहेत. वनश्री अगोदरपासूनच दक्षिण कोकणातच ठाण मांडून आहे. प्रथमाने मालवणच्या समुद्रकिना-याजवळ सध्या समुद्रभ्रमंती सुरु केली आहे
Join Our WhatsApp Community