आरेतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या जंगलात शनिवारी रात्री दारूपार्टी करताना टेहाळणी करणा-या वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सर्व आरोपींवर दोन हजारांचा दंड आकारून वनाधिका-यांनी त्यांना सोडले. वनविभागाने कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासात आरे हा बिबट्याचा अधिवास क्षेत्र असल्याचे सिद्ध झालेले असताना जंगलात रात्री दारुपार्टी करणे जीवघेणेही ठरु शकते. मानवाच्या जंगलात होणा-या हस्तक्षेपात वन्यप्राण्याकडून हल्ला झाल्यास प्राण्याला दोषी ठरवू नका, असा मुद्दा वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला.
आरेतील न्यूझीलंड परिसराजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी परिक्षेत्रअंतर्गत जंगलाचा काही भाग आता मोडला जातो. आरेतील ८१२ एकर भूभाग पर्यावरणदृष्ट्या संवेदशनशील जाहीर झाल्याने न्यूझीलंड परिसरानजीकच्या जंगलात आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग मोडतो. या भागांत रात्री दहाच्या सुमारास वनाधिका-यांच्या टेहाळणी पथकाला तब्बल १४ जणांची दारुपार्टी करताना आढळले. दुचाकीवर स्वार होत त्यांनी जंगलात प्रवेश केला होता. त्यांनी आरोपींना अटक करुन त्यांच्यावर अवैधरित्या जंगल परिसरात प्रवेश केल्याप्रकरणी (ट्रेसपासिंग) प्रत्येक आरोपीवर दोन हजार रुपयांचा दंड आकारला. या आरोपींत आरे अंधेरी परिसरात राहणा-या स्थानिकांचा समावेश होता, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली.
(हेही वाचा – अमरावतीत राणा दाम्पत्याचे जोरदार शक्तिप्रदर्शन)
वनाधिका-यांनी केलेल्या चौकशीत आपण आरेतील जंगलात पहिल्यांदाच आल्याची माहिती आरोपींनी दिली. परंतु त्यांचा वावर पाहता आरोपी जंगलात याअगोदरही येऊन गेल्याचा संशय वनाधिका-यांनी व्यक्त केला. या प्रकरणानंतर आरेत टेहाळणी पथके वाढवली जाईल, अशी माहिती वनविभागाकडून दिली गेली.
बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी अशी घ्या काळजी
० जंगलात अवैधरित्या प्रवेश करु नका
० जंगलात रात्रीचे जाणे टाळा. बिबट्या निशाचर प्राणी आहे. तो रात्री ते भल्या पहाटेपर्यंत जंगलात मुक्त संचार करताना आढळतो.
० मानवी वस्तीजवळ बिबट्याला वावर आढळल्यास ताततडीने १९२६ या वनविभागाच्या हेल्पलाईन क्रमांकाला फोन करा
० बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात रात्री काही आवश्यक कारणासाठी घराबाहेर जाण्याची वेळ आल्यास समूहाने मोबाईलव मोठ्याने गाणी लावून आणि हातात टोर्च घेऊन जा.
० कच-याची विल्हेवाट लावा. कच-यातील अन्नपदार्थ खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढते. भटकी कुत्री बिबट्याचे आवडते अन्न असते.
० घरातील कुत्र्याला रात्री बाहेर न ठेवता घरात आणा