…म्हणून वीर सावरकरप्रेमी साजरा करतात ‘मृत्युंजय दिन’

117

स्वातंत्र्यवीर सावरकरांना २४ डिसेंबर १९१० या दिवशी पहिली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ३० जानेवारी १९११ या दिवशी दुसरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही दोन जन्मठेपेंची शिक्षा म्हणजे पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ! ती २४ डिसेंबर १९६० या दिवशी पूर्ण झाली असती. १९६० मध्ये सावरकरांची सुटका झाली असती तर त्यावेळी सावरकर ७७ वर्षांचे असते. त्या वयातही आपण राष्ट्राचे कार्य करू शकू हा विश्वास त्यांना होता. कारण वयाच्या ८० व्या वर्षी दादाभाई नवरोजी, अठराशे सत्तावन च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरातील वीर योद्धा कुवरसिंह, रामानुजाचार्य ही मंडळी कार्य करतच होती. सावरकरांनी २४ डिसेंबर १९६० हाच मुक्ती दिन मानला होता. पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश सरकार या देशात पन्नास वर्षे टिकले नाही. त्यांची वाणी खरी ठरली.

सावरकरांचा मृत्युंजय दिन

सावरकरांवर नितांत प्रेम करणाऱ्या नागरिकांनी २४ डिसेंबर १९६० हा दिवस सावरकरांचा मृत्युंजय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. महामृत्युंजय दिनानिमित्त अनेक समारंभ आयोजित करण्यात आले होते. तथापि आयोजित करण्यात आलेल्या एकाच समारंभाला सावरकर स्वतः उपस्थित राहिले. लोकांच्या अत्यंत आग्रहामुळे मृत्युंजय दिनानिमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या एकाच समारंभाला सावरकर उपस्थित राहिले. त्यावेळी सुमारे एक लक्ष नागरिक भारत मातेच्या सुपुत्राचा मृत्युंजय दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते. सावरकरांनी रुग्णाईत असतानासुद्धा या कार्यक्रमात एकतास भाषण केले.

सावरकरांच्या अमृतमहोत्सवा नंतर म्हणजे त्यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. ही पदवी स्वीकारण्यासाठी सावरकरांनी पुण्याला यावे असा प्रयत्न केला गेला. पण अखेरीस विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दादर येथील सावरकर सदनात येऊन सावरकरांना डॉक्टरेट पदवी सन्मानाने अर्पण केली. मुंबई विद्यापीठाने वर्ष १९११ मध्ये सावरकरांची बीएची पदवी काढून घेण्याचा ठराव संमत केला होता. तो नंतर रद्द करण्यात आला. आणि सावरकरांना बीएची पदवी मुंबई विद्यापीठाने सन्मानाने दिली.

वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!

अशा मृत्युंजय वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिन्दुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा होता. भारतमातेचे वकीलपत्र घेऊन त्यांनी ब्रिटिश सरकारला जेरीस आणले. आपल्या अशिलासाठी जन्मठेपेच्या शिक्षेवर जाणारा जगातला एकमेव अधिवक्ता म्हणून सावरकरांचा गौरव करण्यात येतो. सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठेला, राष्ट्रकार्याला, दुर्दम्य आशावादाला, द्रष्टेपणाला, अपराजित लढाऊ वृत्तीला, तेजस्वी बुद्धिमत्तेला, अखंड धगधगत राहणाऱ्या विचारांना, असामान्य कवित्व शक्तीला, कोटी कोटी प्रणाम !

(- दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.