ठाणे परिवहन विभागात घोटाळा! आयएएस अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

खोटी कागदपत्रे सादर करून संगनमताने ६ कोटी ७३ लाख ५५ हजार रुपयांचा गैरव्यवहार करून ठाणे परिवहन सेवा विभागाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

ठाणे महानगर परिवहन सेवा विभागात मागील दहा वर्षांत पावणेसात कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एका आयएएस अधिकारी यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा गैरव्यवहार बस थांबे आणि त्यावरील जाहिराती संदर्भात असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

कोणाविरूद्ध दाखल झाली तक्रार?

अशोक करंजकर (५२) तत्कालीन परिवहन व्यवस्थापक ठाणे, श्रीकांत सरमोकदम (सेवानिवृत्त) तत्कालीन परिवहन व्यवस्थापक, कमलाकर दीक्षित (६७) उपव्यवस्थापक परिवहन सेवा ठाणे, अजित निऱ्हाळे (६०) तत्कालीन मुख्य लेखापाल, गुरुकुमार पेडणेकर (६७) वाहतूक अधीक्षक, पिटर पिंटो (५९) लेखा परीक्षक, लक्ष्मीकांत धुमाळ (५४) सुरक्षा अधिकारी, दिलीप कानडे (५५) वाहतूक निरीक्षक, प्रवीण मथुरभाई सोळंखी (५२) खाजगी इसम आणि भावेश भिंडे खाजगी इसम (एमडी गुज्जू ऍडव्हर्टायजिंग) असे गुन्हे दाखल झालेल्या अधिकारी आणि खासगी इसमाची नावे आहेत. अशोक करंजकर हे आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत.

(हेही वाचा : भाजपच्या नेत्यांनी बंजारा समाजाची बदनामी केली! पोलीस ठाण्यांत तक्रारी!!)

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल!

ठाणे महानगर परिवहन सेवा विभागाकडून २००८ मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत टीएमटीचे ४७० बस थांब्यावर जाहिरात करण्यासाठी मे. सोलूर्शन एडव्हर्टायझिंग या कंपनीला प्रायोगिक तत्वावर टीएमटी प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. या कामामध्ये परिवहन समितीतील तत्कालीन सदस्य आणि अधिकारी यांनी संगनमताने या कंत्राटात गैरव्यवहार झाला होता. २००८ पासून ते २०१८ या कालावधीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनवाईच्या दरम्यान गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका आठवड्यात गुन्हा दाखल करू, अशी हमी मुंबई उच्च न्यायालयात दिली होती. एका आठवड्याची मुदत मंगळवारी संपत असताना सोमवारी रात्री या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक ज्योती देशमुख यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

६ कोटी ७३ लाख रुपयाचा घोटाळा !

या सर्वांनी मिळून खोटी कागदपत्रे सादर करून संगनमताने ६ कोटी ७३ लाख ५५ हजार रुपयांचा गैरव्यवहार करून ठाणे परिवहन सेवा विभागाची फसवणूक केली आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here