कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर राज्यभरातील शाळा 1 डिसेंबरपासून ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने राज्यातील चिंता पुन्हा वाढवली. दरम्यान, मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी जारी केले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद होत्या. त्यानंतर येत्या बुधवार पासून पहिली ते सातवीच्या वर्गात विद्यार्थ्यांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
(हेही वाचा-जगातला एकमेव ‘गीताग्रंथ’ ज्याची साजरी केली जाते जयंती!)
आज तातडीची होणार बैठक
कोरोना नियमांचे पालन करून मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात तयारी करण्यात आली आहे. यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू केल्या जातील असे सांगितले जात आहे. तर महापालिका शिक्षण विभागाकडून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी एक आढावा बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये काही राहिलेल्या त्रुटींवर मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती आहे.
मुंबईतील शाळा नियोजित तारखेनुसार सुरू होणार
ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात वाढत असल्याने राज्यभरातील पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचं वातावरण आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी मुलांना शाळेत पाठवायचं की नाही, याबाबत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा आपल्या नियोजित तारखेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जरी उद्यापासून मुंबईतील शाळा सुरू झाल्या तरी शाळेत आपल्या मुलांना पाठविण्यासाठी पालकांना आपले संमतीपत्र देणे बंधनकारक असणार आहे.
Join Our WhatsApp Community