मराठी माणूस आता अटकेपार नव्हे तर जगभर झेंडा रोवू लागलाय, याची प्रचिती गर्जे मराठीच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर येते. त्यामुळे सहा वर्षांच्या काळात इतका दीर्घ पल्ला गाठणाऱ्या गर्जे मराठीला शुभेच्छा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी केले.
मराठी भाषिकांना उद्योग, शिक्षण, नोकरीसह विविध क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या गर्जे मराठी या सेवाभावी संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, गर्जे मराठीचे संस्थापक आणि अध्यक्ष आनंद गानू, सहसंस्थापक संजीव ब्रह्मे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तेव्हाच आपण प्रगतीचा टप्पा गाठला- काकोडकर
काकोडकर म्हणाले, भारताची आर्थिक प्रगती झपाट्याने होतेय, जीडीपी वाढतोय, त्यामुळे येत्या काळात जगातील पहिल्या तीन महासत्तांत भारताचा समावेश झाल्यास नवल वाटायला नको. कारण युवा शक्ती ही भारताची मोठी ताकद आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी गर्जे मराठीसारख्या संस्था पुढाकार घेत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक. पण, माझ्यामते भारत जगातील पहिल्या क्रमांकाची महासत्ता झाली तरी, ते पुरेसे नाही. प्रत्येक भारतीयाचे दरडोई उत्पन्न जगातील पुढारलेल्या देशांइतपत पोहोचेल, तेव्हाच आपण प्रगतीचा टप्पा गाठला, असे म्हणता येईल, असेही त्यांनी सांगितले.
हे माझे भाग्य- अश्विनी भिडे
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या हस्ते गर्जे मराठीच्या ‘इच वुमेन चॅम्पियन’ या उपक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, जगाच्या वेगवेगळ्या देशांत महाराष्ट्राची छोटी रुपे लखलखत आहेत, त्यांचे दर्शन गर्जे मराठीने घडवले. अशा मंडळींच्या मेळाव्यात उपस्थित राहण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजते. जगाच्या कानाकोपऱ्यात इतके मराठी उद्योजक आहेत, याबद्दल माहिती नव्हती. या संस्थेच्या सहवासात आल्यानंतर त्याची प्रचिती आली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
गर्जे मराठीचे कार्य
गर्जे मराठी विषयी माहिती देताना संस्थापक अध्यक्ष आनंद गानू म्हणाले, सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. अनेकांचे आशीर्वाद यामागे आहेत. कोणताही स्वार्थ न ठेवता आमचा प्रत्येक सभासद काम करतो. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आपला देश आणि मराठी मातीवरचे प्रेम. यामुळेच लोक एकत्र येण्यास सुरूवात झाली आणि सभासद संख्या ५ हजारांवर पोहोचली. परदेशात नोकरीसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखतीसाठी तयारी कशी करायची, याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. त्यांचा कल पाहून, सर्वप्रकारची तयारी करून घेतो. परदेशात शैक्षणिक प्रवेशासाठी मदत, व्यवसायाला उभारी देण्यासाठी उद्योग साखळीशी जोडून देण्याचे कामही केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
शिबानी जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर मिनल मोहाडीकर यांनी आभारप्रदर्शन केले केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. गर्जे मराठीशी जोडल्या गेलेल्या आणि अल्पावधीत नावलौकीक कमावलेल्या नवउद्यमींना या वेळी सन्मानित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community