लागोपाठ तीन कासवांचा संपर्क गमावल्यानंतर शास्त्रज्ञांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

177

महाराष्ट्राच्या किनारपट्टीला भेट दिलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांवर सॅटलाईट टॅगिंग करुन त्यांच्या समुद्रभ्रमंतीचा मार्ग शोधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सतत अडथळे येत आहेत. सलग सहा महिन्यांत तीन कासवांचा संपर्क गमावल्यानंतर त्यांच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून बसवलेल्या ट्रान्समीटरमध्येच बिघाड असल्याचा निष्कर्ष भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.आर. राकेशकुमार यांनी मांडला. ट्रान्समीटरच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे पत्र डॉ.आर राकेशकुमार यांनी ट्रान्समीटर बनवणा-या न्यूझीलंड देशातील ‘सीरट्रॅक’ या कंपनीला लिहिले असून, आठवडाभरात कंपनीकडून याबाबत माहिती मिळणे अपेक्षित असल्याचे सांगितले. उरलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीवरील ट्रान्समीटर खराब होऊ नये, या आशेवर कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ आहेत.

याच धर्तीवर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून भारतीय वन्यजीव संस्थेच्यामार्फत पाच ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंग करुन ट्रान्समीटर बसवले गेले. पाचपैकी लक्ष्मी या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा संपर्क मार्च महिन्यात तुटला. महिन्याभरातच तिचा संपर्क तुटल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. मात्र मे महिन्यात प्रथमा आणि लागोपाठ सावनी या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांकडून ट्रान्समीटरच्या माध्यमातून मिळणारा सिग्नल बंद पडला. कासवांचा नैसर्गिक मृत्यू, मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून या कारणांपेक्षाही ट्रान्समीटरमधील बॅटरीच्या क्षमतेबाबतही डॉ राकेशकुमार यांनी शंका उपस्थित केली.

प्रथमा, लक्ष्मी आणि सावनी या तीन मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या सॅटलाईट टॅगिंग ट्रान्समीटरचा खर्च कांदळवन कक्षाने उचलला होता. रेवा आणि वनश्री या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या सॅटलाईट टॅगिंग ट्रान्समीटरसाठी भारतीय वन्यजीव संस्थेने आर्थिक साहाय्य केले. प्रत्येक सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून लावलेल्या ट्रान्समीटरसाठी एक लाख ७५ हजारांचा लाखांचा खर्च आला आहे. त्यानुसार तीन ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटल्यानंतर कांदळवन कक्षाला नऊ लाखांच्या नुकसानाचा भार पेलावा लागला आहे.

ट्रान्समीटर निर्मात्या कंपनीचे स्पष्टीकरण

तीन ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटल्याची माहिती ट्रान्समीटर बनवणा-या सीरट्रॅक कंपनीला दिली गेली. इतर प्रकल्पासाठी कंपनीने बनवलेल्या ट्रान्समीटरबाबतीतही हाच अनुभव आल्याची माहिती कंपनीने शास्त्रज्ञ डॉ आर राकेशकुमार यांना दिली. कंपनीच्या ट्रान्समीटरमधील बॅटरीमध्ये ७०० दिवसांची म्हणजेच दोन वर्षांची कार्यक्षमता आहे. मात्र बॅटरी १२० दिवस चालत बंद पडल्याचा अनुभव महाराष्ट्रात राबवलेल्या प्रकल्पादरम्यान शास्त्रज्ञांना आला.

जमलेल्या माहितीवरुनच निष्कर्ष मांडणार

लक्ष्मी, प्रथमा आणि सावना जितके दिवस ट्रान्समीटरच्या माध्यमातून संपर्कात होत्या. त्या मर्यादित दिवसांच्या आधारावरच प्रकल्पातील निष्कर्ष पूर्ण केला जाईल, अशी माहिती शास्त्रज्ञ डॉ आर. राकेशकुमार यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.