परमबीर सिंग यांच्यावर 24 तासांत दुसरा गुन्हा दाखल!

हे दोन्ही गुन्हे एकत्र करुन तपास केला जाण्याची शक्यता आहे.

100

परमबीर सिंगांसह ८ जणांविरुद्ध खंडणी आणि बोगस दस्तऐवज प्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता अवघ्या २४ तासांत परमबीर सिंग, डीसीपी पराग मनेरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

दोन गुन्हे दाखल

बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या शरद अग्रवाल याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पोलिस ठाण्यांत दाखल झालेले गुन्हे एकमेकांशी संबंधित असल्यामुळे, हे दोन्ही गुन्हे एकत्र करुन तपास केला जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः परमबीर सिंग यांच्यावर पुन्हा नवीन गुन्हा दाखल! अडचणी वाढणार)

‘या’ आठ जणांविरोधात गुन्हा

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीवरुन मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे, गुन्हे शाखेचे माजी अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोरके, संजय पाटील आणि बांधकाम व्यावसायिक संजय पुनामिया, सुनील जैन या आठ जणांविरुद्ध गुरुवारी खंडणी, धमकी, कट रचणे, फसवणूक आणि बोगस दस्तावेज या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोघांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे.

(हेही वाचाः देशमुख, ठाकरे सरकारला मोठा धक्का… उच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका)

जमीन हडपणे आणि कट रचण्याचा ठपका

गुरुवारी रात्री ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या शरद अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरुन परमबीर सिंग, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनामिया, सुनील जैन आणि मनोज घोटकर या पाच जणांविरुद्ध खंडणी, फसवणूक बोगस दस्तऐवज तयार करुन जमीन हडपणे आणि कट रचणे या कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे गुन्हा?

परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त आणि मनेरे हे ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त असताना, श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद आणि शुभम या दोघांना कोपरी येथील परमबीर सिंग यांच्या सरकारी घरी बोलावून घेतले होते. त्यांच्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली, तसेच त्यांची जमीन बळजबरीने खोटे दस्तऐवज बनवून बळकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचाः ‘त्या’ अधिकाऱ्यांचा इस्राईल दौरा वादाच्या भोवऱ्यात, राजकीय वातावरणही तापले)

विशेष पथक करणार तपास?

मरिन ड्राईव्ह आणि कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे एकमेकांशी संबंधित असल्यामुळे, तसेच दोन्ही गुन्ह्यातील काही आरोपी हे एकच असल्यामुळे हे दोन्ही गुन्हे एकत्रित करुन तपास करण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष तपास पथक गठीत करुन हा तपास विशेष पथकाकडे सोपवण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.