ठाणे खाडीतून सॅटलाईट टॅगिंग केलेला दुसरा फ्लेमिंगो पक्षी एका दिवसांत गुजरात राज्यातील भावनगरमध्ये पोहोचल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस)च्या शास्त्रज्ञांना आढळले. याआधीही जून महिन्याअखेरीस सहा सॅटलाईट टॅगिंग केलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांपैकी हुमायून पक्ष्याने पहिल्यांदा ठाणे खाडी सोडली होती. सलग दोन्ही फ्लेमिंगो पक्षी गुजरातच्या भावनगर परिसरात पोहोचले. त्यापैकी नुकताच भावनगर परिसरात पोहोचलेल्या सलीम नावाच्या पक्ष्याने एका दिवसांत थेट ठाणे खाडीतून गुजरात राज्यातील भावनगर गाठल्याने शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्काच बसला.
( हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत केवळ पंधरा मिनिटे चर्चा, खासदारांचा कल जाणून घेण्यावर ठाकरेंचा भर )
याआधी २८ जून रोजी हुमायून नावाच्या लेसर फ्लेमिंगो प्रजातीच्या पक्ष्याने ठाणे खाडी सोडली. सुरुवातीला पालघर आणि नंतर गुजरातच्या सीमेकडील भागांत मुक्काम केल्यानंतर थेट समुद्रामार्गे हुमायूनने गुजरात राज्यातील भावनगर परिसरातील पाणथळ जमीन गाठली होती. ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी सलीम नावाच्या लेसर फ्लेमिंगो प्रजातीच्या पक्ष्याने ठाणे खाडीतील आपला मुक्काम हलवला. सलीम दुस-या दिवशी थेट गुजरात राज्यातील भावनगर परिसरात पोहोचल्याने दोन्ही पक्ष्यांचा भ्रमंतीची पद्धत एकमेकांहून वेगळी असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले.
साधारणतः हिवाळ्यात डिसेंबर महिन्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे मोठ्या संख्यने ठाणे खाडी परिसर व नजीकच्या पाणथळ जमिनीकडे येतात. पावसाळा सुरु होण्याअगोदर फ्लेमिंगो पक्षी निघून जातात, असा सर्वसाधारण समज आहे. यंदा जून अखेरीस मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जूनच्या अखेरच्या आठवड्यांत पावसाचा जोर ओसरल्यानंतर हुमायूनने ठाणे खाडी सोडली आणि त्यानंतर सलीम या लेसर प्रजातीच्या फ्लेमिंगो पक्ष्याने ठाणे खाडी सोडली. दोन्ही फ्लेमिंगो पक्षी सध्या भावनगर परिसरातील अधिवासातच राहत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. आता सहा फ्लेमिंगो पक्ष्यांपैकी उर्वरित चार सॅटलाईट टॅगिंग झालेले फ्लेमिंगो पक्षी अजूनही ठाणे खाडी परिसराजवळच आढळत आहेत. बहुतांश फ्लेमिंगो पक्ष्यांनी आता पावसाचा जोर वाढल्यानंतर ठाणे खाडीचा परिसर सोडून नवी मुंबईचा अंतर्गत भाग गाठला आहे.
Join Our WhatsApp Communityसलीम या लेसर फ्लेमिंगोने ६ जुलै रोजी ४ वाजून ५७ मिनीटांनी ठाणे खाडीचा परिसर सोडला. दुस-या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी तो गुजरात राज्यातील भावनगर परिसरातील पाणथळ जमिनीत पोहोचला.
डॉ राहुल खोत, उपसंचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी