बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहण्यासाठी आलेल्या तीन बिबट्याच्या बछड्यांची अचानक तब्येत ढासळली. महिन्याभरापूर्वी त्यांना पुणे येथील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारांसाठी पाठवले होते. मात्र आधीपासूनच मरणावस्थेत पोहोचलेल्या तीनपैकी दुसरा बछड्याचाही मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात दुसऱ्या मादी बछड्याचा मृत्यू झाला. राष्ट्रीय उद्यानात पूर्णवेळ व निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राणी मृत्यू पावल्याची यंदाच्या वर्षांतील ही तिसरी घटना आहे.
याआधी 3 जून रोजी वाघाटी मृत्यू पावला. या मृत्यूला अपघाती मृत्यूचे नाव दिले गेले. 10 जून रोजी उद्यानात कायमस्वरूपी दाखल झालेले तिन्ही बिबट्याचे बछडे अचानक चालायचे बंद झाले. तीन आठवड्यानंतर त्यांना स्वतःच्या पायांवर उठताही येईना. या काळात उद्यानात बिबट्याची दररोज काळजी घ्यायला पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नव्हते.
( हेही वाचा: लव्ह जिहाद : भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजनबद्ध षडयंत्र! )
8 ऑगस्ट रोजी दोन खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उद्यानाला भेट देऊन तिघांची रक्ततपासणी केली. या रक्ततपासणीमध्ये बिबट्यांना कॅल्शिअमची आणि ड जीवनसत्वाची कमतरता असल्याचे दिसून आले. त्यानंतर उद्यान प्रशासन घाबरले. सुरुवातीला चेंबूर येथील एका खासगी पशुवैद्यकीय क्लिनीकमध्ये बछडयांना उपचारासाठी एॅडमिट केले गेले. त्यानंतर तिन्ही बछड्यांना उपचारासाठी पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले. एक्स-रे अहवालात तिघांच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर दिसून आले. तिघेही प्रकृती गंभीर अवस्थेतच असताना पुण्यातील रेस्क्यू संस्थेत दाखल झाले. आठवड्याभरात पाहिला बछडा मृत्यू पावला. गेल्या आठवड्यात दुसरा बछड्याचा मृत्यू झाला. तिसऱ्या बछड्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. मात्र बिबट्याच्या प्रकृतीविषयी तसेच उपचारादरम्यान दोन बिबट्या मृत्यू पावल्याची अधिकृत माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने दिलेली नाही.