पतीचा पहिला विवाह कायदेशीररित्या रद्द बातल ठरला नसेल तर दुसरी पत्नी मृत पतीच्या सेवानिवृत्तीवेतनासाठी म्हणजेच पेन्शनसाठी अपात्र ठरणार आहे. जोपर्यंत पहिल्या पत्नीशी कायदेशीर घटस्फोट होत नाही, तोपर्यंत दुसरी पत्नी मयत पतीच्या पेन्शनसाठी पात्र ठरणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
काय आहे प्रकरण
सोलापूर येथील महिलेची यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या महादेव ताटे या व्यक्तीने दोन लग्न केली होती. 1996 मध्ये महादेव ताटे यांचा मृत्यू झाला. त्यांनी दोन विवाह केले असले, तरी कायद्यानुसार त्यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीला पेन्शनचा लाभ मिळत होता, मात्र आपल्याला पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, म्हणून महादेव यांची दुसरी पत्नी शामल ताटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
(हेही वाचा – राज्यातील पाच ऑलिव्ह रिडले कासवांचा भ्रमंती मार्ग कसा शोधणार? जाणून घ्या… )
महादेव ताटे यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे. पतीच्या पश्चात पेन्शनचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून आपण राज्य सरकारकडे 2007 ते 2014 या काळात चार वेळा पत्र व्यवहार केला. मात्र सरकारकडून त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे याचिकाकर्त्या शामल ताटे यांच्यातर्फे खंडपीठासमोर सांगण्यात आले. आपल्याला तीन अपत्ये असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला पेन्शन देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी खंडपीठाकडे केली.
‘सरकारचा निर्णय योग्य’
पहिला विवाह कायदेशीररित्या रद्द बातल ठरला नसेल तर दुसरा विवाह बेकायदेशीर ठरवावा, असे अनेक निवाडे सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे. यासह यांचा विवाह बेकायदेशीर आहे, महादेव यांची पहिली पत्नी जिवंत असताना आणि त्यांचा विवाह रद्द बातल ठरला नसताना शामल यांनी महादेव यांच्याशी विवाह केला. त्यामुळे त्यांची याचिका निकाली निकाली काढण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community