कोरोनाची धास्ती कायम! मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि नववर्षानिमित्त मुंबई पोलिसांकडून ७ जानेवारी २०२२ पर्यंत जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी लागू केलेल्या आदेशात म्हटले आहे की, ३० डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ७ जानेवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि इतर कायदेशीर तरतूदींखालील कारवाई केली जाईल.

जाणून घ्या शासनाच्या नियम, अटी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच मुंबईत नववर्षाच्या स्वागतानिमित्त मोकळ्या किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ, अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आधी ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लावली होती. आता त्याचा कालावधी वाढवून ७ जानेवारीपर्यंत करण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यावर निर्बंध असणार आहेत. तसेच मुंबईमध्ये होणारी सार्वजनिक कार्यक्रम सभा यासाठी सुद्धा शासनाकडून नियम आणि अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा- कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा युएई दौरा रद्द)

रात्री ९ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी

नववर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबईत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, यावर पोलीस दल आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी समूहाने एकत्र वावरण्यास मनाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here