अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणा-या भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील बाबासाहेब शिंदे या भोंदू बाबाने गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य सभा भरवत अनेकांना गंडा घातला आहे. दरम्यान या बाबावर जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे.
अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक
कॅन्सर,रक्तदाब आणि यांसारख्या असंख्य दुर्धर आजार केवळ डोक्यावर हात ठेऊन बरे करत असल्याचा दावा या भोंदू बाबाने केला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या परंडी गावात बाबासाहेब शिंदे हा आरोग्य सभा भरवत भोळ्या बाबड्या जनतेची फसवणूक करत होता. बाबासाहेब आपण पादरी असल्याचे सांगत लोकांची दुर्धर आजारातून सुटका करत असल्याचे सांगत होता. त्यामुळे आजारपणातून मुक्त होण्यासाठी अनेक जिल्ह्यांतून रुग्ण बाबाकडे येत असत. अखेर एका वृत्तवाहिनीने या बाबाचे भांडाफोड केले आहे.
(हेही वाचाः भर रस्त्यात एसटीचे ब्रेक फेल झाले, चालकाने दाखवले प्रसंगावधान आणि…)
चौकशीचे आदेश
अंनिसचे राज्य चिटणीस शहाजी भोसले यांनी बाबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. पैठण मतदारसंघाचे आमदार आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी या भोंदू बाबाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पोलिसांकडून बाबासाहेब शिंदे याची चौकशी होणार आहे.
Join Our WhatsApp Community