आता नववर्षाच्या आगमनाच्या मुहूर्तावर तुम्ही गाडी घेण्याचं ठरवलं असेल, तर तुम्ही गाडी तर बुक करु शकता, पण तुम्हाला बुक केलेली गाडी 2023 नंतरच मिळेल. असं का?, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, कारण त्याआधी 2021 च्या सुरुवातीला बुक करुन ठेवलेल्या गाड्या लोकांना अजून मिळालेल्या नाहीत. लोक खिशात पैसे घेऊन बसले आहेत, पण गाड्या मात्र उपलब्ध नाहीत, तर अस का ते आपण जाणून घेऊया.
गाड्या वेटींग लिस्टवर
गेल्या काही महिन्यांपासून भारतासह जगभरातील कंपन्यांना सेमी कंडक्टरच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, इंटेलचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी म्हटले आहे की, 2023 पूर्वी जगातील चिप्सची कमतरता संपणार नाही. या सेमी कंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे भारतात जवळजवळ 7 लाख गाड्यांची वेटिंग लिस्ट आहे. त्यात 2 लाख 50 हजार मारुती गाड्या, ह्युंडाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा या कंपन्यांच्या 1-1 लाख गाड्या वेटिंग वर आहेत.
जगाला मोठा फटका
या सेमी कंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे जगभरातील 170 इंडस्ट्रीजचे जवळजवळ 150 लाख करोडचे नुकसान झाले आहे. जपानमध्ये टोयोटा, सुझुकी, नेसान या मोठ्या गाड्यांची निर्मीती होते. त्यामुळे जपानसारख्या देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. भारत या सेमी कंडक्टर चीपची दुस-या देशातून आयात करतो. त्यामुळे भारताला पूर्णपणे दुस-या देशावर अवलंबून राहावे लागत आहे.
आता यातही भारत आत्मनिर्भर
आपल्या देशात सेमी कंडक्टरची निर्मीती होत नसल्याने, भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता भारत सरकारने एक योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत सेमी कंडक्टर चीपची निर्मीती भारतात केली जाणार आहे. त्यासाठी 75 हजार करोड रुपयांची योजना आखण्यात आली आहे. अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच येत्या काळात भारताला सेमी कंडक्टर चीपसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
म्हणून निर्माण झाला तुटवडा
गेल्या वर्षी, लॉकडाऊनमुळे सेमी कंडक्टर चीपची निर्मीती थांबली होती. त्यामुळे गाड्या उत्पादकांकडून चिप्सच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. या कमी झालेल्या उत्पादनामुळे चीपचा तुटवडा निर्माण झाला आणि जगातील ऑटोमोबाईल कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
( हेही वाचा: सलमान खुर्शिद यांच्यावर एफआयआर दाखल)
Join Our WhatsApp Community