केअरटेकरकडून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला, पतीचा मृत्यू पत्नी गंभीर जखमी

123

चोरी करण्याच्या उद्देशातून केअरटेकरने वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी, 13 फेब्रुवारी रोजी रात्री जोगेश्वरी पूर्व येथे घडली. या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झालेली असून तिला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर फरार झालेल्या केअरटेकरला दादर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे.

सुधीर चिपळूणकर (७०) आणि सुप्रिया चिपळूणकर (६९) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव असून हे दाम्पत्य जोगेश्वरी पूर्व मजास वाडी येथील श्री समर्थ को -ऑप हौसिंग सोसायटीत राहत होते. या दोघांची काळजी घेण्यासाठी पप्पू गवळी (२९) हा मागील काही महिन्यापासून केअरटेकर म्हणून नोकरी करीत होता. सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पप्पू गवळी याने चोरीच्या उद्देशातून सुधीर चिपळूकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला, दरम्यान या दाम्पत्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी घरातील भांडी खिडकीतून फेकण्यास सुरुवात केल्यामुळे इमारतीच्या खाली खेळणाऱ्या मुलांनी चिपळूणकर दाम्पत्य याच्या घराकडे धाव घेऊन घराची बेल वाजवताच पप्पू गवळी हा सावध झाला व दार उघडताच पपू गवळी या केअरटेकरने तेथून पळ काढला.

घरी आलेल्या सोसायटीतील मुलांनी चिपळूणकर या वृद्ध दाम्पत्याना रक्ताच्या थारोळ्यात बघून इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बोलावून घेतले, दरम्यान या घटनेची माहिती मेघवाडी पोलिसांना देण्यात आली. मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी सुधीर चिपळूकर यांना तपासून मृत घोषित करून सुप्रिया यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पप्पू गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. दरम्यान केअरटेकर पप्पू गवळी हा दादर येथून सिद्धेश्वर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तात्काळ दादर रेल्वे स्थानक गाठून काही तासातच पप्पू गवळीला करण्यात आली आहे, चिपळूणकर दाम्पत्याकडे भरपूर पैसे आणि सोन्याचे दागिने असल्याची माहिती पप्पूला मिळाली होती, त्याने यापूर्वी अनेक वेळा घरातील पैसे आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी हे दाम्पत्य आडवे आल्यामुळे त्याचे प्रयत्न फसले गेले, अखेर या दाम्पत्याना जीवे मारून लुटण्याची योजना केअरटेकर गवळी याने आखली होती अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

(हेही वाचा दिल्लीत घडले आणखी एक श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.