दिल्ली आकाशवाणीहून मराठीत बातम्या वाचणारे पहिले वृत्तनिवेदक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचे आज, सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर मेहेंदळे यांच्या मुंबईतील मुलुंड-पूर्व येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
डॉ. मेहेंदळे यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचल्या होत्या. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. “मला भेटलेली माणसे” हा त्यांचाय एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. शिवाय त्यावेळी दूरदर्शनवर असलेला “वाद-संवाद” हा कार्यक्रम मेहेंदळे यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता. यशवंतराव ते विलासराव, आपले पंतप्रधान यासह 18 हून अधिक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. यामध्ये आपले पंतप्रधान, आपले वैज्ञानिक, ओली-सुकी, इंदिरा गांधी व लीला गांधी, केसरीकारांच्या पाच पिढ्या, गांधी ते पटेल, तुझी माझी जोडी, नरम-गरम (कथासंग्रह), नाट्यद्वयी, पंडितजी ते अटलजी, भटाचा पोर (वैचारिक), मला भेटलेली माणसे, मला माहीत असलेले शरद पवार (संपादित ग्रंथ), मीडिया, यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव ते अशोकराव, यशवंतराव ते विलासराव, राष्ट्रपती आणि सरसंघचालक या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी काही नाटकांमध्येही काम केले आहे. विश्वास मेहेंदळे सिम्बोयसीस इ्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक होते.
( हेही वाचा: कोचर दाम्पत्याला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर )
Join Our WhatsApp Community