भारतात हजारो कसाब निर्माण करण्याचा प्रयत्न… वाचा पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितलेला ‘नवा दहशतवाद’

आता कसाबची गरज नाही, कारण भारतविरोधी मानसिकतेचे हजारो कसाब देशात तयार केले जात आहेत.

भारतातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याच्या अनेक बातम्या अलीकडच्या काळात प्रसार माध्यमांमध्ये पहायला मिळतात. यामध्ये देशातील आणि देशाबाहेरील अनेक प्रसार माध्यमे, वृत्तपत्रं उलटसुलट चर्चा करुन भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतीतच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी परखड मत व्यक्त केले आहे. देशातील ज्या शक्ती नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत हरवू शकत नाहीत, त्यांच्याकडून मोदींना बदनाम करण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

देशातील तरुणांची मानसिकता दूषित करुन, भारतात हजारो कसाब निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हे छुपे युद्ध

शत्रू आपली रणनीती समोरच्या शत्रूच्या गुणवत्तेनुसार बदलत असतो. त्यामुळे आता भारतात 26/11 सारखे दहशतवादी हल्ले करुन, देशाला हादरवण्याचा प्रयत्न भारताच्या शत्रूंकडून होणार नाही. तर अपप्रचार करुन, भारताची बदनामी करण्याचा कुटील डाव त्यांनी मांडला आहे, असे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले. बैद्धिक पातळीवर हा कट रचण्यात येत असून, हे एक प्रकारचे छुपे युद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न

कोरोना परिस्थिती, शेतकरी आंदोलन, बंगालमधील हिंसाचार याबाबत अनेक खोट्या कहाण्या प्रसार माध्यमांकडून रचण्यात आल्या. न्यूयॉर्क टाईम्सने मध्यंतरी आपल्या दिल्ली आणि मुंबई ब्यूरोतील नोकरीसाठी एक जाहिरात काढली. या जाहिरातीत जो मोदीविरोधी लिखाण करू शकेल त्याला नोकरीची संधी देण्यात येईल, असे स्पष्टपणे म्हटले गेले आहे. मोदी भारतात मुसलमानांना संपवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत, हिंदू राष्ट्रवाद आणण्याचा कसा प्रयत्न करत आहेत, याबाबतच्या भाकड कथा जो रचू शकेल, त्यालाच नोकरी मिळेल, असे या जाहिरातीत म्हटले आहे. देशाबाहेरील मीडिया मोदींना बदनाम करण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करत आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे, असा खुलासा पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केला.

 

न्यूयॉर्क टाईम्सची जाहिरात

काही भारतीयांमध्ये आजही गुलामगिरीचे विषाणू

भारतातील मोठा वर्ग न्यूयॉर्क टाईम्स सारख्या अनेक परदेशी वृत्तपत्रांची गुलामी करत आहे. कारण आपल्या देशातील काही लोकांमध्ये गुलामगिरीचे विषाणू आजही जिवंत आहेत. या मानसिकतेमुळेच आपल्या देशातील बुद्धीजीवी विचारवंतांनी काही सांगितले तर त्यांची किंमत शून्य आहे, पण गो-यांनी एखादी गोष्ट सांगितली तर हे लोक लगेच त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. हे सुद्धा देशातील वातावरण गढूळ होण्याचं मोठं कारण आहे, असे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

भारतविरोधी मानसिकतेचे कसाब

सरकारने संविधानाच्या आधारे देशात नवे समाजोपयोगी कायदे करण्याचा प्रयत्न केला, तरी सरकारला मुस्लिमविरोधी आणि समाजविघातक ठरवण्यात येते. मोदी देशाची वाट लावत आहेत, मोदींनी देश विकायला काढला आहे, अशाप्रकारच्या अनेक दंतकथा आजकाल पसरवल्या जात आहेत. त्यामुळे आता देशात कसाब पाठवायची गरज नाही, कारण भारतविरोधी मानसिकतेचे हजारो कसाब देशात तयार केले जात आहेत, असे परखड मत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केले.

हा नवा दहशतवाद

इंग्लंड हा संयुक्त राष्ट्र संघाच्या संरक्षण परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य आहे. त्यामुळे जगभरातील मुस्लिमांकडून तिथल्या लेबर पार्टीवर दबाव आणून, संयुक्त राष्ट्र संघात काश्मिरमध्ये 370 कलम हटवण्याबाबत तक्रार करण्यास सांगितले. असे केल्यास सर्व मुस्लिम मते ही लेबर पार्टीला मिळतील, असे आश्वासन देण्यात आले. देशाच्या भौगोलिक सीमेत कुठला निर्णय घ्यावा, हा प्रत्येक देशाचा आंतर्गत प्रश्न आहे. पण तरीही देशातील काही लोकही मोदींना निवडणुकीत हरवू शकत नाहीत, म्हणून अशा खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. यात मोठे पत्रकार, कलाकार, बड्या अधिका-यांची मुलं भारतविरोधी प्रचार करुन देशातील तरुणांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा एक नव्या पद्धतीचा दहशतवाद आहे, असे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here