भारतातील लसीकरणावरुन होणा-या आरोपांना आता सीरमने दिले उत्तर

इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 2 ते 3 महिन्यांत लसीकरण करणं शक्य नाही.

109

भारतातील लसीकरणावरुन विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला टार्गेट केले जात आहे. लसीकरणाच्या बाबतीत केंद्र सरकारचा ढिसाळ कारभार असून, त्यामुळे लसीकरणाला वेग मिळत नसल्याचे आरोप, विरोधकांनी केंद्र सरकारवर केले आहेत. तसेच भारतातील लसींचा पुरवठा परदेशात का पाठवला, असे आरोप काँग्रेसकडून करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांना आता, जगातील कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्तर दिले आहे.

काय आहे सीरमचे ट्वीट?

कोविशिल्डची निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या आरोपांना उत्तर देताना, ट्वीट करत मांडले हे मुद्दे-

  • जानेवारी 2021 मध्ये आपल्या देशात लसीकरण मोहिमेला पहिल्यांदा सुरुवात झाली. त्याचवेळी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा कमी झाली होती.
  • पण त्याचवेळी जगातील इतर देशांमध्ये कोरोनाचे थैमान सुरू होते. त्यामुळे त्यांना आरोग्य सुविधांची अत्यंत आवश्यकता होती. म्हणूनच भारत सरकारने इतर देशांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. म्हणून भारतात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने आपण तेव्हा लसींचा बाहेरील देशांना पुरवठा केला.
  • आजवर कायमच संकटकाळी इतर देशांना मदत करण्याचे भारताचे धोरण राहिले आहे. यामुळेच 2020 मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेत सुद्धा, इतर देशांनी भारताला आरोग्य विषयक सुविधांसाठी लागणा-या तंत्रज्ञानाची मदत केली आणि आज भारतात परिस्थिती पुन्हा बिघडली असताना सुद्धा भारताला इतर देशांतून मदतीचा ओघ सुरू आहे.

  • कोरोनाला कुठल्याही राजकीय किंवा भौगोलिक सीमा नाहीत. जोपर्यंत संपूर्ण जग एक होत नाही, तोवर आपण कोरोनावर मात करू शकणार नाही. त्यामुळेच भारताने लसीकरण मोहिमेसाठी जगातील इतर देशांना आश्वासन दिले आहे.
  • आपल्या देशात लसीकरणाला लागणा-या कालावधीवरुन टीका करताना आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे आपली लोकसंख्या. भारत जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 2 ते 3 महिन्यांत लसीकरण करणं शक्य नाही. तसेच त्यासाठी अनेक अडथळ्यांचाही समाना करावा लागतो. संपूर्ण जगातील देशांचे लसीकरण करायला किमान 2 ते 3 वर्ष नक्कीच लागतील.
  • आजवर लसींच्या उत्पादन आणि पुरवठ्याच्या बाबतीत आपण जगातील टॉप-3 पैकी एक आहोत. तसेच आपण हे उत्पादन अजून वाढवून भारतीयांना त्याचा जास्तीत-जास्त फायदा कसा होईल, यासाठी प्रयत्न करत आहोत.
  • भारत सरकारला मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट अहोरात्र काम करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनीही एकत्र येऊन या महारोगराई विरुद्ध लढा देणे गरजेचे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.