माळढोक पक्षापाठोपाठ तणमोर पक्षाच्याही अस्तित्वाला धोका

127

विणीच्या हंगामात गुजरात राज्याला भेट देणा-या तणमोर पक्षांबाबत गुजरात वनविभाग आणि कॉर्बेट फाऊंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेने २०२० साली सॅटलाईट टॅगिंग प्रकल्प राबवला होता. या प्रकल्पाबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या पर्यावरणप्रेमी संस्थेने शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. या शोधनिबंधात गेल्या वर्षी चंद्रपूरात मृतावस्थेत आढळून आलेल्या सॅटलाईट टॅगिंग तणमोर पक्षाचाही विजेच्या तारेवर आदळून मृत्यू झाल्याचे दिसून आले. माळढोकपाठोपाठ आपल्या अस्तित्वाची लढाई लढणा-या तणमोर पक्षाचाही विजेच्या तारांमुळे मृत्यू होत असल्याने पक्षांसाठी देशभरात विजेच्या तारांजवळ पक्षांचे मन विचलित करणारी उपकरणे (बर्ड डायव्हर्टर्स) लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

तणमोरावर सॅटलाईट टॅगिंग करण्यामागील कारण 

गुजरात राज्यात तणमोर पक्षांची संख्या जून ते सप्टेंबर महिन्यात ब-यापैकी आढळते. अंडी घातल्यानंतर तणमोर पक्षी गवताळ प्रदेशाला अलविदा करतात. पक्षी कुठून येतो, यामागील कोडे सोडवण्यासाठी गुजरात वनविभागाने नर-मादी तणमोराच्या जोडीला सॅटलाईट टॅगिंग केले. मादीने पावसाळ्यानंतर थेट तेलंगणात मुक्काम केला. मात्र परतताना तिचा चंद्रपूरातील मानवी वस्तीजवळील भागांत विजेच्या तारेला धडकून मृत्यू झाला.

सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांसाठी माळढोक या पक्षाला वाचवण्यासाठी विजेच्या तारा जमिनीखाली उभारा किंवा विजेच्या तारांवर पक्षांना विचलित करणारी उपकरणे (बर्ड डायव्हर्टर्स) लावण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही, ही सूचना देशभरात पाळणे गरजेचे आहे.
– केदार गोरे, प्रमुख, कॉर्बेट फाऊंडेशन

तणमोर पक्षाच्या जोडीच्या सॅटलाईट टॅगिंगबाबतची माहिती 

  • ४ सप्टेंबर २०२० रोजी गुजरात राज्यातील काळवीट राष्ट्रीय उद्यानातील तणमोराच्या जोडीवर सॅटलाईट टॅगिंग केले गेले. यापैकी नर तणमोर २७ सप्टेंबरनंतर उद्यानापासून १२ किमी अंतराजवळ फिरु लागला. २०२१ साली जुलै महिन्यात तो काळवीट राष्ट्रीय उद्यानात परतला. महिन्याभरातच त्याला उद्यानाबाहेरील क्षेत्र पुन्हा खुणावू लागले. नजीकचे ८ किलोमीटरचे अंतर पार करुन तो उद्यानात परतला. नर तणमोर संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात गुजरात राज्य सोडून गेला नाही.

(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! विधानसभेत तुफान फटकेबाजी)

  • मादी तणमोराने २०२० साली सॅटलाईट टॅगिंग झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात काळवीट राष्ट्रीय उद्यान सोडले. १७ दिवसांत ५४२ किमी अंतर कापत महिन्याअखेरीपर्यंत ती महाराष्ट्रात पोहोचली. आठवडाभर महाराष्ट्रात विश्रांती घेतल्यानंतर तिने आपला मुक्काम दक्षिणेकडे वळवला.
  • कर्नाटक राज्यात तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर तेलंगण राज्यात ती ९ नोव्हेंबर रोजी पोहोचली.
  • तणमोर पक्षी गुजरात राज्यात प्रजनन काळ पूर्ण केल्यानंतर तेलंगणापर्यंत जात असल्याचा खुलासा या सॅटलाईट टॅगिंग प्रयोगातून समोर आला. गुजरात ते तेलंगणा राज्यातील प्रवासात २७ दिवसांच्या प्रवासात मादी तणमोराने ७७६ किलोमीटरचे अंतर पार केले होते.
  • मादी तणमोराचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील प्रवास पाहता शास्त्रज्ञांना उत्सुकता वाढत होती. तेलंगणापर्यंतच्या प्रवासात तिने एकदा २४ तासांतच १४३.५३ किमी अंतर पार केले. एकदा केवळ १.२८ किमी अंतर कापत आराम केला.
  • तेलंगणातील वास्तव्यात मादी तणमोराने संपूर्ण हिवाळ्यात १२ वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले. तेलंगणात मादी तणमोर चार ठिकाणी प्रामुख्याने दिसून आली. २०२१ सालच्या मे महिन्यात मादीने गुजरात राज्यात परतीचा प्रवास सुरु केला. चंद्रपूरात ३३ हजार व्हॉल्ट विजेच्या तारेचा धक्का लागत २३ जून रोजी तिचा मृत्यू झाला.

संशोधनातील निष्कर्ष 

अतिसंकटग्रस्त म्हणून घोषित झालेल्या तणमोरांच्या घटत्या संख्येबाबत तातडीने उपायोजना करणे गरजेचे आहे. तणमोर जमिनीवर अंडी घालत असल्याने भटकी कुत्रे इतर जनावरांकडून ती अंडी खाल्ली जातात. शिकार, गवताळ प्रदेशाचा -हासदेखील तणमोर पक्षाच्या घटत्या संख्येचे प्रमुख कारण मानले जाते. परंतु या प्रकल्पामुळे विजेच्या तारेच्या धक्क्याने तणमोर मृत्यूमुखी पडत असल्याचा उलगडा तणमोर पक्षांच्या धोकादायक ठरणा-या घटकांमध्ये मोडला जात असल्याचे समोर आले, अशी माहिती कॉर्बोट फाऊंडेशनचे प्रमुख केदार गोरे यांनी सांगितले. परंतु या प्रकल्पामुळे विजेच्या ताराही दुर्मिळ पक्षांच्या मृत्यूचे कारण ठरत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती उघडकीस आलली.

बीएनएचएसच्या शोधनिबंधात सहभागी संशोधनकर्ते

गुजरात वनविभाग आणि कॉर्बोट फाऊंडेशनच्यावतीने या संशोधनात मोहन राम, दुश्यंत वसावदा, श्यामलाल, टीकादार, लहर झाला, यशपाल झाला तसेच दवेश गढवी आणि ताहीर अली रदर यांनी सहभाग नोंदवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.