अलीकडे विदेश प्रवास केलेल्या आणि ओमायक्रॉन या कोविड विषाणू प्रकाराची बाधा झालेल्या एका व्यक्तिसह मुंबईत एकाच ठिकाणी काम करताना संपर्कात आलेल्या अन्य सात जणांना देखील ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी करण्यात आली होती. त्यानंतरच्या कोविड चाचणीत या एकूण आठ नागरिकांपैकी सात जणांचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. तर अन्य एक जण रुग्णालयात दाखल असून त्याचाही कोविड अहवाल उद्या अपेक्षित आहे. या आठही जणांच्या निकटच्या अन्य व्यक्तिंची कोविड चाचणी केली असता ते सर्व निगेटिव्ह आढळले आहेत.
एका व्यक्तिच्या चाचणी अहवालाची प्रतिक्षा
अलीकडे विदेश प्रवास केलेल्या एका नागरिकाला कोविड-१९ सदृश्य लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यात त्यांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी विदेश प्रवास केल्याची माहिती सांगितल्यानंतर तातडीने त्यांच्या समवेत मुंबईत एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या निकटच्या संपर्कातील सात जणांचीही कोविड चाचणी करण्यात आली. त्यात त्यांनाही बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र ते लक्षणेविरहीत (एसिम्प्टोमॅटिक) आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व आठही जणांचे बाधित झाल्याचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (पुणे) येथे जनुकीय सूत्र निर्धाकरण (जीनोम सिक्वेंसिंग) पडताळणीसाठी पाठविण्यात आले. या सर्वांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या आठपैकी फक्त एकच जण रुग्णालयात दाखल आहे. तर, या आठ पैकी एक जण मुंबई बाहेरील रहिवासी आहे.
(हेही वाचा – विरारमध्येही ओमायक्रॉनचा प्रवेश)
दिलासा ‘त्या’ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह
दरम्यान, या आठही जणांची नुकतीच कोविड चाचणी केली असता, त्यातील सात जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर रुग्णालयात दाखल नागरिकाचा अहवालही उद्या अपेक्षित आहे. या रुग्णास अतिशय सौम्य लक्षणे आढळली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या आठही जणांच्या निकटच्या अन्य सहवासित व्यक्तिंची कोविड चाचणी केली असता ते सर्व निगेटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी, निकटच्या संपर्कातील या सहवासितांची पुन्हा एकदा फॉलो अप चाचणी करण्यात येणार आहे.