गाडीत मोबाईल चार्जिंग करणे पडले महागात; अपघातात सात जण जखमी

गाडीत मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे बुधवारी दुपारी घाटकोपर येथे मोठा अपघात झाला, या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून तीन रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

( हेही वाचा : राज्यातील लम्पीबाधित 4600 जनावरे रोगमुक्त)

राजू यादव (४२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राजू हा रिक्षा चालक असून बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गारोडिया नगर, या ठिकाणी उभा होता. त्याच्या मोबाईल फोनला चार्जिंग नसल्यामुळे तो जवळच उभ्या असलेल्या टुरिस्ट गाडीत मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेला. गाडी सुरू करून मोबाईल चार्जिंगला लावत असतांना अचानक गियर ओढला गेला आणि मोटार पुढे जाऊ लागल्यामुळे गोंधळलेल्या राजू कडून ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले गेले आणि गाडी सुसाट पुढे जाऊन या गाडीने पादचारी व तीन रिक्षांना धडक दिली. ही गाडी पुढे ५० मीटर अंतरावर जाऊन थांबली.

हा विचित्र अपघात घाटकोपर पूर्व गारोडिया नागर, पुष्पक जंक्शन या ठिकाणी झाला. या अपघातात जखमी झालेल्या सातही जणांना उपचारासाठी राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राजेंद्र बिंद(४९),सपना सनगरे(३५),आदित्य सनगरे (९),वैष्णवी काळे वय (१६), जयराम यादव, (४६)श्रध्दा सुशविरकर (१७), भरतभाई शहा (६५) असे जखमींची नावे आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here