मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता अडविणार

अनिल गलगली यांस महापालिकेची माहिती

141

26 जुलै 2005 पासून आजमितीस मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली 1150 कोटी खर्च केले पण तरीही मिठी साफ होईना. कारण आजही सांडपाणी, रासायनिक सांडपाणी नदीत बिनधास्त सोडले जात आहे. आता मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडविले जाणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेने दिली आहे.

पालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रित?

मिठी नदीमध्ये दोन्ही बाजुकडून उत्सर्जीत होणाऱ्या सांडपाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अनिल गलगली यांनी तक्रार केली होती. याबाबत पर्जन्य जल वाहिनी विभागाचे उप प्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी अनिल गलगली यांना कळविले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सुचविली आहेत. सल्लागाराने सुचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत, गट क्र. 1 अंतर्गत, फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते मिठी किना-यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड येथे प्रस्तावित 8 द.ल.घ.ली. एवढ्या क्षमतेच्या मल शुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रीया करण्याचे प्रस्तावित केले आहे. हे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून मे 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सांडपाणी अडवून मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणार

सल्लागाराने सुचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र. 2 अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोटया नाल्यामधून मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे ई. कामांचा अंतर्भाव आहे. हे कामे प्रगतीपथावर असून डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

काम प्रगतीपथावर असून 2025 पर्यंत पूर्ण होणार

या कामाची निविदा प्रकिया प्रगतीपथावर आहे. गट क्र. 4 अंतर्गत मुख्यतः मरोळ-बापट नाला व सफेद पूल नाला या दोन पातमुखांद्वारे मिठी नदीध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते धारावी स्थित सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यंत बोगद्याद्वारे वळविण्याचे काम अंतर्भूत आहे. हे काम प्रगतीपथावर असून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. साकीनाका येथील लाठिया रबर रोडवरील रेडिमिक्स कंपनीवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेस कळविण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.