बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’बंगल्या भोवती गर्दी केलेल्या चाहत्यांना मोबाईल चोरांनी चांगलाच झटका दिला आहे. चाहत्यांनी ‘मन्नत’बंगल्या वरून थेट पोलीस ठाणे गाठून आपला मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
वांद्रे पोलिसांनी चाहत्यांच्या तक्रारी दाखल करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २५ ते ३० जणांचे मोबाईल चोरीला गेले असून त्यात काही जणांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
२ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा वाढदिवस साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे देशभरातून शेकडोच्या संख्येने त्याचे चाहते आदल्या दिवशी रात्री १२ वाजता शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’ या बंगल्याजवळ जमा झाले होते. शाहरुखचा वाढदिवस म्हटलं की, चोरांची दिवाळी असते, शाहरुखच्या चाहत्यांच्या घोळक्यात मोबाईल चोर, पाकिटमार,सोनसाखळी चोर मिसळले होते.
शाहरुखची एक झलक बघण्यासाठी चाहते उत्सुक असताना, मोबाईल चोर व इतर चोरांनी संधी साधली आणि मोबाईल चोरले. चाहत्यांचे मोबाईल फोन, खिशातले पाकिटे चोरी करून चोरटे पसार झाले. शाहरुखला शुभेच्छा देऊन चाहत्यांनी घराची वाट धरली त्यांच्या लक्षात आले की त्यांचे मोबाईल फोन पाकिटे चोरीला गेली होती, चाहत्यांनी मग ‘मन्नत’बंगल्या वरून थेट वांद्रे पोलीस ठाणे गाठले.
( हेही वाचा: ठाकरे गटाचे नेते शरद कोळी पोलिसांना चकवा देत अज्ञात स्थळी रवाना; पोलिसांकडून शोध सुरु )
वांद्रे पोलीस ठाण्याच्याबाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी गर्दी केली, कुणाचे मोबाईल फोन तर कुणाचे पाकीट, घड्याळे चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी २५ ते ३० जणांच्या तक्रारी दाखल करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. प्रत्येकवर्षी शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन चोरीला जातात, पोलीसांकडून त्यांना वारंवार सांगण्यात येते की, आपले मौल्यवान वस्तू व मोबाईल फोन सांभाळा परंतु हे चाहते शाहरुखची एक झलक बघायला मिळावी म्हणून स्वतः हरवून जातात, त्यांना दुसरे कुठले भान उरत नसल्याचे एका पोलीस अधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. वांद्रे पोलिसांनी ‘मन्नत’बंगला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वृत्तवाहिन्यांच्या कॅमरेचे फुटेज ताब्यात घेतले असून या फुटेजच्या माध्यमातून चोरांचा शोध सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community