मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा असलेल्या मुंबईहून गोव्याला जाणा-या क्रूझवर एनसीबीने शनिवारी रात्री खोल समुद्रात छापेमारी केली. यावेळी 8 जणांना एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीनंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह तिघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान एनसीबीला दिलेल्या माहितीत आर्यन खानने आपण ड्रग्स क्रूझवर कसे नेले याबाबतचा खुलासा केला असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः कसे आले क्रूझवर ‘ड्रग्स’? जाणून घ्या संपूर्ण माहिती)
चौकशीत समोर आली माहिती
चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सर्वांची एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीवरुन एनसीबीने आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आठ जणांमध्ये आर्यन खान याचाही समावेश आहे. आर्यन खानसह मूनमून धमेचा, अरबाझ मर्चंट यांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.या तिघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यानंतर मग किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
असे घेऊन आला आर्यन ड्रग्स
आर्यन खानच्या चौकशीमध्ये एनसीबीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. लेन्सच्या कव्हरमध्ये आर्यन ड्रग्स घेऊन गेला होता, असा त्याच्यावर आरोप असून तो ते ड्रग्स स्वतः घेण्यासाठी घेऊन आला होता, अशी कबुली आर्यनने दिल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचाः मुंबई टू गोवा ड्रग्स क्रूझः 8 जण ताब्यात! बड्या अभिनेत्याच्या मुलाची चौकशी, म्हणाला मी…)
या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
आर्यन खान
नुपूर सारिका
इस्मित सिंग
मोहक जैस्वाल
विक्रांत चोकेर
गोमित चोप्रा
मूनमून धमेचा
अरबाझ मर्चंट