मुंबईत थरकाप उडवून देणाऱ्या शक्ती मिल कंपाऊंड सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर करताना या प्रकरणातील तीनही दोषींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना गुरुवारी, २५ नोव्हेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ऑगस्ट 2013 मध्ये मुंबईतील शक्ती मिल परिसरात महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने याआधी 2014 मध्ये यातील आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
शक्ती मिल बलात्कार प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. यात विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेप दिली होती. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठण्यात आले होते. तर उर्वरीत विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या तिघांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
(हेही वाचा भाजपाची एसटी आंदोलनातून माघार, कामगार मात्र संपावर ठाम!)
महिला फोटोग्राफरवर केलेला अत्याचार
22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. पीडित महिला सहकाऱ्यासोबत तिथे गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे अन्य एका 19 वर्षीय तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील आरोपीदेखील तेच होते. मुंबई सत्र न्यायालयाने यातील आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप तर इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community