शकुंतला रेल्वे युद्धपातळीवर सुरु व्हावी या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याकरिता शकुंतला रेल्वेचा २० जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्थानकावर डॉ विठ्ठल वाघ यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. अकोला रेल्वे स्थानकावर दर्शनीय स्थळी स्थापलेल्या शकुंतला रेल्वे इंजिनला फुलांचे हार घालून सजविण्यात आले. शकुंतला बचाव आंदोलनाचे झेंडे-बॅनर लावण्यात आले.
‘शकुंतला गाडी गरिबांची नाडी’
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक-कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी शकुंतला गाडीवर रचलेले ”गोपाला गोपाला सुरु करा ही शकुंतला” हे गाणं गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विजय विल्हेकर यांनी शकुंतला बचाव सत्याग्रहाची भूमिका विशद करतांना अकोला रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी शासनाने १५० कोटी खर्च केले. मग गोरगरिबांच्या शकुंतला रेल्वेसाठी १०० कोटीं खर्च करून रेल्वे सुरु करावी, अशी शासनाला विनंती केली. कृष्णा अंधारे यांनी या सत्याग्रहाला अकोलेकरांची समर्थ साथ असल्याची ग्वाही दिली. यावेळी ”शकुंतला गाडी गरिबांची नाडी”, शकुंतला रेल्वे सुरु झालीच पाहिजे अशा घोषणा सत्याग्रहींनी दिल्या. या वाढदिवस कार्यक्रम व सत्याग्रहात शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे विजय विल्हेकर, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे, रेल्वे पूल तंत्रज्ञ रामदास चव्हाण, विजय लाजूरकर, चंद्रकांत झटाले, धनंजय मिश्रा, अरुणाताई चव्हाण, सिंधुताई विल्हेकर, सीमाताई टागोर, नितीन झटाले सहभागी होते.
(हेही वाचा – खानापूर नगर पंचायत: पडळकरांच्या होमग्राऊंडवर भाजपचा भोपळाही फुटला नाही!)
येत्या २६ जानेवारी २०२२ गणतंत्र दिनी, यवतमाळ ते अचलपूर सर्व रेल्वे स्थानकावर, शकुंतला रेल्वेच्या लोकतंत्री स्वातंत्र्यासाठी, ध्वज संचलन व डॉ विठ्ठल वाघ रचित शकुंतला रेल्वे स्वातंत्र्याचे गीत गायन होणार आहे. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर २६ जानेवारी २०२२ ला ध्वज संचलन होणार असून,यवतमाळ रेल्वे स्थानकावर छोट्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, तसेच अचलपूर रेल्वे स्थानकावर, तीनशे फुटी राष्ट्रीय ध्वज, रेल्वे रुळावरून चालविण्यात येणार, तसेच नॅरोगेज रेल्वे निर्मितीचे मुख्य ठिकाणी परेल मुंबईला ध्वज संचलन करणार असल्याची माहिती विजय विल्हेकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community