पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारच!

सत्ताधारी पक्षातील नेत्याचा गौप्यस्फोट; अजित पवारांना राजभवनवर पाठवून आयत्यावेळी फासे फिरवले

117
२३ नोव्हेंबर २०१९ चा दिवस उजाडला तो एका धक्कादायक बातमीने. टोकाचे विरोधक असलेल्या दोन पक्षातील नेत्यांनी, म्हणजेच भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शरद पवार यांनी राजकीय डावपेच खेळत, अजित पवार यांना स्वगृही परत आणले, अशा बातम्या माध्यमांत झळकल्या. परंतु, या पहाटेच्या शपथविधीमागे खुद्द शरद पवारच होते, असा गौप्यस्फोट सत्ताधारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

पवारांनी पाठिंबा देण्याचे कबुल केले

नागपूर येथे निवडक पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना पहाटेच्या शपथविधीचा प्रश्न चर्चेत आला. त्यावेळी हा नेता म्हणाला, २०१९च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी अडमुठी भूमिका स्वीकारली. त्यामुळे आम्ही इतर पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा तेथे भाजपा-राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा झाली. पवारांनी पाठिंबा देण्याचे कबुल केले.

बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीची खेळी

त्यानंतर दोन-तीन दिवसांत शरद पवार यांनीच अजित पवारांना शपथविधीसाठी राजभवनावर पाठवले. ‘अजितला पाठवतोय, बाकीचे त्याच्याशी बोलून घ्या’, असा निरोप त्यांनी फोन करून दिला. २३ नोव्हेंबर २०१९ला शपथविधी झाला, मंत्रिपदाचा कोटाही ठरवण्यात आला. पण त्यानंतर शरद पवारांनी फासे असे काही फिरवले, की नाईलाजास्तव नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. शिवाय बदनामी झाली ती वेगळीच. पहाटेच्या शपथविधीनंतर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर वाढली. सर्वाधिक मंत्रीपदे, मलईदार खाती आणि सरकारचा संपूर्ण ताबा मिळतोय, हे ध्यानात घेऊन पवारांनी आमचा पाठिंबा कोणत्याही चर्चेविना काढून घेतला. आमच्यासोबत आले असते तर, सरकारचा ताबा आणि इतकी महत्त्वाची मंत्रीपदे त्यांना मिळाली नसती, असेही या नेत्याने सांगितले.

…तेव्हा अमित शहांचा ओरडा खाल्ला

आमची गाडी १०५ वर अडकल्यानंतर शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढली. मात्र, उद्धव ठाकरे इतका टोकाचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. पण, निकालाच्या सायंकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले, तेव्हा अमित शहांनी शंका व्यक्त केली. उद्धव ठाकरे वेगळे काहीतरी करण्याच्या तयारीत आहेत, लक्ष ठेवा, असा निरोप त्यांनी दिला. तेव्हा महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांना ठामपणे सांगितले, की उद्धव ठाकरे असे काहीच करणार नाहीत, याची आम्हाला पक्की खात्री आहे. पण दुर्दैवाने अमित शहा यांची शंका खरी ठरली. त्यानंतर आम्हाला त्यांचा ओरडाही खावा लागला, असे या नेत्याने सांगितले.

‘ऑपरेशन कमळ’ची पार्श्वभूमी

सेना-भाजपा युतीच्या सरकारपासून एकनाथ शिंदे आणि आमचा रॅपो चांगला होता. महाविकास आघाडीत त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. पण शरद पवार यांनी त्यांचा पत्ता कापला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पद हुकल्यामुळे शिंदे काहीसे नाराज होते. त्या नाराजीला आम्ही हेरले आणि पुढची रणनीती आखण्यास सुरुवात केली. याची कानोकान खबर महाराष्ट्रातील एकाही नेत्याला नव्हती. गटनेता आमच्या सोबत असल्याने आम्हाला केवळ २९ आमदारांची गरज होती. पण आम्ही जो विचार केला होता त्यापेक्षाही जास्त आमदार फोडण्यात यश मिळाले. साधारणपणे कोण फुटू शकतो, याचा अंदाज घेतला होता. पण, काय करायचे आहे, याची माहिती एकाही आमदाराला दिली नव्हती. आता दोन तृतीयांश आमदार शिंदेंसोबत असल्याने कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही, असेही या नेत्याने सांगितले.

शिंदेंना मुख्यमंत्रीपद का मिळाले?

गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवावा, या हेतूने आम्ही हे अवैध सरकार पायउतार केले. बदला पूर्ण झाला. पण, आपले राजकीय करिअर पणाला लावून बाहेर पडलेल्या या आमदारांना न्याय मिळावा, यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी केवळ एकनाथ शिंदे यांना माहिती होती. अन्य एकाही आमदाराला याची कानोकान खबर लागू दिली नाही. या सर्व ऑपरेशनमध्ये अमित शहा मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते, असे हा नेता म्हणाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.