गांधी स्मृती व दर्शन समिती संग्रहालायतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘अंतिम जन’ या नियतकालिकात स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती करण्यात आली आहे. पण यावरुन आता एका वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. त्याचबाबत सावरकरप्रेमी व अभ्यासक अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या मुलाखतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे महत्व सांगितले आहे.
गांधी स्मृती दर्शन समिती संग्रहालयाने जर स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती केली असेल तर त्यांनाही सावरकरांचे विचार गांधींपेक्षा देशाला कसे समर्थ बनवतील हे कळलं असेल, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
त्यांनाही पटू लागलंय…
गांधी स्मृती दर्शन समिती संग्रहालयाने जर आपल्या नियतकालिकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा गौरव केला असेल तर ही त्यांनी आपली चूक सुधारली आहे. हे उशिरा आलेले शाहणपण असून मी त्याचं स्वागत करतो. गांधी स्मृती दर्शन समितीला देखील आता सावरकरांचे महत्व कळायला लागले आहे. गांधी विचारांपेक्षा सावरकरांचे विचार देशाला कसे समर्थ बनवतील हे त्यांना आता पटायला सुरुवात झाली आहे त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
सावरकरांच्या विचारांचं सरकार सत्तेत
गेल्या 75 वर्षांत आपण ज्या गोष्टी केल्या त्याचे परिणाम आपण भोगले आहेत. त्यामुळे या काळात ज्यांना सातत्याने डावललं गेलं, आता त्या सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाणारं सरकार 2014 सालापासून देशात सत्तेत आलं आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुतीसुमने, पोवाडे गायले गेलेच पाहिजेत, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
सावरकरांनी हिंदुंना अस्तित्वाची जाणीव करुन दिली
स्वातंत्र्यवीर सावरकरांची केवळ स्तुती नाही तर स्तुतीसुमने सातत्याने गायली गेली पाहिजेत. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत जर सावरकर आपण पोहोचवले तर हा देश स्वाभिमानाने उभा राहील. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंना तुम्ही हिंदू आहात याची सर्वात आधी जाणीव करुन दिली. गांधींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश हिंदुराष्ट्रवादाच्या प्रवाहामध्ये वाहत चालला होता.
हिंदुराष्ट्रवाद हा वरवर चांगला दिसत असला, सर्वांना सोबत घेऊन जाणारा वाटत असला तरी त्यात काही त्रुटी होत्या. त्यामुळे हा हिंदुराष्ट्रवादाचा प्रवाह किती धोक्याचा आहे, याने मातृभूमीची कशी शकलं होणार आहेत, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सगळ्यात आधी जनतेला पटवून दिलं आहे, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community