लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगला बाजारात तेजी आली आहे. शेअर बाजाराचा अंक मोठ्या तेजीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 524 अंकांनी वाढला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निळ्टी निर्देशांकात 162 अंकांनी वाढ झाली आहे. ट्रेडिंग बंद होताना सेन्सेक्समध्ये 0.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 59 हजार अंकांवर स्थिरावला, तर निफ्टीमध्ये 0.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 17 हजार 730 अंकांवर स्थिरावला.
दरवर्षी परंपरेनुसार दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका तासासाठी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचा कार्यक्रम संपन्न होत असतो. यावर्षी हा मुहूर्त 6.15 ते 7.15 या काळात होता.
60 हजारांचा टप्पा हुकला
मुहूर्त ट्रेडिंगला बाजारात तेजी येऊन तो 60 हजारांचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हा टप्पा गाठता न येऊन तो 59 हजार 831 वर स्थिरावला. तब्बल 2 हजार 606 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 727 कंपन्यांचे शेअर्स घसरले.
50 वर्षांहून जुनी परंपरा
शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगची चालणारी परंपरा ही जवळपास 50 वर्षांपेक्षा जुनी आहे. मुंबई शेअर बाजारात ही परंपरा 1957 मध्ये तर राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. दिवाळीच्या दिवसांत लक्ष्मीपूजन या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर केलेली गुंतवणूक ही मोठी लाभदायक समजली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा खरेदीकडे जास्त असतो.
Join Our WhatsApp Community