अयोध्येतील भव्यदिव्य श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारीला साजरा होणार आहे. त्यापूर्वीच स्टॉक मार्केटही तेजीत असल्याचे दिसत आहे. एका छोट्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
अनेक धार्मिक स्थळांवर टेंट सिटी उभारणाऱ्या प्रवेग लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची किंमत वर्षभरात २५० रुपयांवरून ७५० रुपयांपर्यंत वाढली आहे, अशा प्रकारे कंपनीने एका वर्षात तिप्पट परतावा दिला आहे. आता ही कंपनी अयोध्येतील राम जन्मभूमीजवळ टेंट सिटीचे काम करत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात उद्घाटन होणार असून दिवसागणिक या धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. याचा फायदा कंपनीसह गुंतवणूकदारांनाही होतोय. सध्या अयोध्येव्यतिरिक्त कंपनीचे वाराणसीतील काशी विश्वनाथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, कच्छच्या रणजवळदेखील टेंट सिटी आहे.
(हेही वाचा – USD 100-Billion Net Worth : १०० अब्ज अमेरिकन डॉलरचा उद्योग समुह चालवणारी ‘ही’ महिला कोण आहे)
नुकतीच कंपनीला लक्षद्वीपच्या पर्यटन विभागाकडून नवीन कामाची ऑर्डर मिळाली आहे. याअंतर्गत कंपनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्विपच्या अगत्ती पेटावर रेस्टॉरंट, क्लोक रूम, चेंजिंग रूम आणि इतर सुविधांसह किमान ५० तंबूंचा विकास, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापनाचे काम करेल. ३ वर्षांसाठी ही ऑर्डर देण्यात आली असून पुढील २ वर्षांसाठी ऑर्डर वाढवली जाऊ शकते.
कंपनीचे कामकाज ?
प्रवेग लिमिटेड ही जाहिरात कंपनी असून हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, प्रकाशन आणि रिअल इस्टेट मार्केटिंग इत्यादींमध्येही सेवा पुरवते. सध्या या कंपनीकडे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या १८० ऑपरेशनल रूमचा मोठा पोर्टफोलिओ आहे. प्रवेग लिमिटेडने उत्कृष्ट त्रैमासिक आणि वार्षिक निकाल जाहीर केले असून गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ विक्रीत १२% आणि निव्वळ नफ्यात ११% वाढ झाली.