साईभक्तांमध्ये नाराजी, शिर्डीत लाऊडस्पीकर विना होणार काकड आरतीसह शेजारती!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४ मेच्या अल्टीमेटमनंतर पोलीस प्रशासनाकडून सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आल्या आहेत. या नोटीसनंतर शिर्डीच्या साई संस्थान अर्थात साई मंदिराला देखील याचा फटका बसला आहे. या नोटीसमुळे साईबाबांची पहाटेला होणारी काकड आरती आणि रात्री साडेदहा वाजता होणारी काकड आरती आता लाऊडस्पीकर विनाच होणार आहे. पोलिसांनी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिल्याने साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा – मौलवींचा मोठा निर्णय! मुंबईतील ‘या’ २६ मशिदींमध्ये भोंग्याविना होणार पहाटेची अजान)

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीत लाऊड स्पीकरवरून साई मंदीरात होणाऱ्या चारही आरत्या लावल्या जातात. साईमंदीरात आरत्यांना उपस्थित राहू न शकणारे भाविक याच लाऊडस्पीकरच्या माध्यामातून आरत्यांचा आवाज एकत सहभागी होतात. साई बाबांच्या मंदीरात पहाटे ५ वाजता भुपाळी सुरू होते त्या नंतर पहाटे सव्वा ५ वाजता काकड आरती होते. त्यानंतर रात्री दहा वाजता शेजारती सुरु होते, यापूर्वी या आरत्या साईमंदीर आणि परिसरात लावण्यात आलेल्या स्पीकरद्वारे ऐकवल्या जात होत्या. मात्र ३ मे ला शिर्डी पोलिसांनी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नसल्याने साईमंदीरावरील लाऊडस्पीकर वापरु नये, असे आदेश दिले. यानंतर ३ मे रोजी रात्री साईबाबांची शेजारती आणि पहाटे होणारी काकड आरती लाऊडस्पीकरवरून झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईतील मौलवींचा मोठा निर्णय

दरम्यान, राज्यभरात भोंग्यांचा मुद्दा गाजत असताना मुंबईतील मौलवींनी मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी मुंबईतील २६ मशिदींच्या धर्मगुरुची बैठक पार पडली रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर आता मुंबईतील मशिदीत पहाटेची अजान ही लाऊडस्पीकरविना करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

भोंग्याविनाच होणार अजान

भायखळ्यातील मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मुस्लिम धर्मगुरुंमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दुसरीकडे मुंबईतील झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी मुंबईतील मालाडू मालवणी येथील मशिदींमधून अजान देण्याबाबत मशिदींचे ट्रस्टी आणि मौलानांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मालाड, मालवणीतील जवळपास सर्व मशिदींच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मुंबई पाठोपाठ राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मुस्लिम धर्मगुरुंनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सकाळची अजान ही भोंग्याविनाच करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here