शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईसह राज्यातील अनेक भागातील शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीस वंदन केले. शिवसैनिकासह तमाम जनसागर बुधवारी शिवाजी पार्कवर लोटला होता. मात्र, या बाळासाहेबांच्या स्मृती वंदन केल्यानंतर या सर्व शिवसैनिकांनी शिवतिर्थाचेही दर्शन घेतले. स्मृतीस्थळावरुन निघालेल्या प्रत्येक शिवसैनिकांचे पाय क्षणभर शिवतिर्थासमोर थांबत होते आणि या शिवतिर्थाचे दर्शन घेऊनच ते माघारी परतत होते.
(हेही वाचा- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित)
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्कला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतिर्थ असे नाव दिले होते. बाळासाहेबांनी शिवाजीपार्कचा उल्लेख शिवतिर्थ म्हणून केला आहे. एकच मैदान आणि एकच व्यक्ती अशाप्रकारे बाळासाहेबांनी लाखोंच्या सभा घेऊन विशाल जनसमुदायाला विचारांचे सोने वाटले होते. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांची तोफ शेवटच्या श्वासापर्यंत धडधडत राहिली. त्यामुळे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर शिवाजी पार्क मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्या जागेची शेजारी त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीस वंदन करून आंदरांजली वाहण्यासाठी सकाळपासून शिवसैनिकांनी गर्दी केली होती. मुंबईसह राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक याठिकाणी बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी आले होते. शिवसेना नेते, पदाधिकारी तसेच मंत्री आणि शिवसैनिक आदी रांगेत उभे राहून शिस्तीने वंदन करत होते.
कृष्णकुंजवरून राज यांनी शिवतिर्थावर हलवला मुक्काम
मात्र, बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन केल्यानंतर शिवाजीपार्कवरून माघारी फिरताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे. राज ठाकरे यांनी शिवाजीपार्कमध्ये प्रशस्त बंगला उभारला असून याचे नामकरणही त्यांनी ‘शिवतिर्थ’ असे केले आहे. त्यामुळे कृष्णकुंजवरून राज ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुक्काम हलवला असून बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करून निघताना प्रत्येक शिवसैनिकाची नजर ही राज ठाकरे यांच्या ‘शिवतिर्थ’ या निवासस्थानावर पडत होती. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक क्षणभर तिथे थांबून त्यांचे निवासस्थान न्याहाळत होते. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करून स्वतंत्र पक्ष काढला असला तरी यापूर्वी ते शिवसेनेतच होते. आणि त्यांच्याबद्दल आजही शिवसैनिकांमध्ये प्रेम आहे. त्यामुळे ,राजसाहेबांचा हा बंगला अशी एकमेकांना सांगत काही शिवसैनिक तर सेल्फीही काढत होते. त्यामुळे घोळक्या घोळक्याने शिवसैनिक राज ठाकरे यांच्या शिवतिर्थाचे दर्शन घेत पुढे सरकत होता. त्यामुळे शिवाजीपार्कवर लोटलेल्या शिवसैनिकांचा जनसमुदाय हा बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करतानाच शिवतिर्थाचेही दर्शन घेत असल्याचे चित्र पहायला मिळत होते.
Join Our WhatsApp Community