महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचा झटका : विशेष समित्यांवरील सदस्य संख्या घटवली!

शिवसेनेचे संख्याबळ आता या विशेष समित्यांवर वाढले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी पार पडलेल्या महापलिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला.

मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. राज्यातील सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादागिरी करत असली तरी मुंबई महापालिकेत आपणच भाई आहोत, असे शिवसेनेने त्यांना दाखवून दिले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सख्य असले तरी महापालिकेत मात्र, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची संधी शिवसेनेने सोडलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या एका नगरसेवकाचे महापालिका सदस्यत्व बाद होताच विशेष समित्यांवरील त्यांच्या सदस्य संख्येला कात्री लावली आहे. त्यामुळे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांची वर्णी विशेष समित्यांवर लागत होती, तिथे आता त्यांच्या केवळ एकाच सदस्याची वर्णी लागली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या ८ एवढी झाली!

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले होते. परंतु जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक ७८च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नाजिया अब्दुल जब्बार सोफी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या ८ एवढी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य कमी झाल्याने याचा परिणाम विशेष समित्यांवरील त्यांच्या पक्षाच्या सदस्य संख्येवर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक असल्याने स्थापत्य उपनगरे समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, बाजार व उद्यान समिती, विधी समिती आणि महिला व बाल कल्याण समितीवर त्यांचे प्रत्येकी २ नगरसेवकांची सदस्य म्हणून निवड केली जायची. परंतु त्यांचा एक नगरसेवक कमी झाल्याने याचा परिणाम समित्यांवरील सदस्य संख्येवर झाला आहे. त्यामुळे या सर्व समित्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य कमी झाला आहे.

(हेही वाचा : महापालिका शाळांमधील मुख्याध्यापक बनणार ‘स्वावलंबी’!)

राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे सदस्य कमी करून सेना सदस्यांची वर्णी

नाझिया सोफी यांचे महापालिका सदस्यत्व कोरोनापूर्वीच महापालिका सभागृहात रद्द करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनापूर्वी मार्च महिन्यांमध्ये वैधानिक समित्यांवरील निवृत्त सदस्यांच्या नावाची घोषणा करताना या विशेष समित्यांवरील गणसंख्येवरील परिणाम लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याची संख्या कमी करणे आवश्यक होते. परंतु ही बाब लक्षात येताच सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका दिला. विशेष समित्यांवरील एक सदस्य कमी होतानाच पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनाही जोरदार झटका बसला आहे. कप्तान मलिक हे वृक्ष प्राधिकरणावर सदस्य असून पक्षाचे आता केवळ ८ नगरसेवक असल्याने प्राधिकरणावर त्यांना सदस्य म्हणून राहता येत नाही. त्यामुळे मलिक यांचीही गच्छंती होणार आहे. शिवसेनेने यापूर्वीच मनसेचे ६ नगरसेवक फोडून त्यांना मोठा दणका दिला होता. परंतु सहा नगरसेवक शिवसेनेत गेलेल्यानंतरही पक्षाचे एकमेव नगरसेवक असलेले संजय तुर्डे हे स्थापत्य उपनगरे समिती, बाजार व उद्यान समितीवर सदस्य म्हणून कायम हाते. मुळात त्यांचा एकमेव नगरसेवक असल्याने महापालिकेच्या विशेष समित्यांवर तोलानिक संख्याबळानुसार त्यांचा एकही सदस्य जावू शकत नाही. परंतु तुर्डे हे एकमेव नगरसेवक असूनही या दोन्ही समित्यांवर सदस्य म्हणून असल्याने अखेर त्यांचीही गच्छंती या दोन्ही समित्यांवरून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे सदस्य कमी करून शिवसेनेच्या सदस्यांची वर्णी लागली जाणार आहे. मनसेचे पाच सदस्य तसेच जात पडताळणीत बाद झाल्याने त्या रिक्तजागी शिवसेनेचे नगरसेवक वाढून त्यांची नगरसेवक संख्या ९३वर पोहोचली आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आता या विशेष समित्यांवर वाढले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी पार पडलेल्या महापलिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याने शिवसेनेला एक वर्षाकरता याकडे दुर्लक्ष करून त्यांचे दोन सदस्य तिथे जातील ,अशी व्यवस्था करता आली असती, पण शिवसेनेने त्यांना झटका देण्याची नामी संधी हातची न दडवता महापालिकेत आम्हीच भाई असल्याचे दाखवून दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here