मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये रेल्वेच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाच्यावतीने जागा खाली करण्यासंदर्भात नोटीस जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन या रेलवे जागांवरील बाधित कुटुंबांना ‘ प्रधानमंत्री आवास योजने’ त सामावून घेण्यात यावे अशी मागणी केली. तसेच यासाठी केंद्रीय स्तरावर नवे धोरण तयार करण्याचीही मागणी केली. त्यामुळे नवे धोरण जाहीर करून बाधित झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई तुर्तास स्थगित करावी, अशीही विनंती या निवेदनाद्वारे खासदारांनी रेल्वे राज्य मंत्र्यांकडे केली आहे.
बाधितांना घरे मिळेपर्यंत, कारवाई थांबवावी…
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन रेल्वेच्या हद्दीतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वे रुळांलगत आणि रेल्वेच्या जागेवर उभ्या असलेल्या झोपड्या आणि अन्य बांधकामे हटवण्यासंदर्भात संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई करताना बाधितांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या सूचनेचा विचार व्हावा,असे म्हटले आहे. या बाधितांना पर्यायी व्यवस्था करून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ तील पोट कलमानुसार पर्यायी घरे उपलब्ध करून दिली जावीत. झोपडपट्टी पुनर्विकास योजने अंतर्गत या बाधितांना कायमस्वरूपी घरे मिळेपर्यंत ही हटवण्याची कारवाई थांबवली जावी, असे म्हटले आहे.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये भाजप नगरसेवकांना बनवले अस्थिर! )
कुटुंबांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे निवेदन
किंग सर्कल व गुरु तेग बहादूर या रेल्वे स्थानकाजवळ राहणाऱ्या झोपडीधारकांना ४ आठवड्यात जागा खाली करण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने पाठवल्याने यासंदर्भात स्थानिक भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. ही कुटुंबे ५० वर्षांपासून वसलेली असून या कुटुंबांना दिलासा मिळावा अशी मागणी शिरवडकर यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. माटुंगा पूर्व व पश्चिममधील कमला रामन नगर येथील सुमारे ४०० कुटुंब असून त्यांनाही याचप्रकारची नोटीस पश्चिम रेल्वे बजावली आहे.
या शिष्टमंडळात खासदार गजानन किर्तीकर यांच्यासह अरविंद सावंत, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, ,श्रीरंग बारणे, राजन विचारे, कृपाल तुमने, राजेंद्र गावित यांचा समावेश होता. या निवेदनाला रेल्वे राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि अन्य शहरातील रेल्वेच्या जागेवर वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टी धारकांना दिलासा मिळणार आहे.