सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपने मागील वर्षी मंजूर केलेल्या रस्ते प्रगतीचा अहवाल मागत पटलावर मांडण्यात आलेले प्रस्ताव तोवर राखून ठेवण्याची सूचना केल्यानंतर रस्ते कामाला विलंब शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला होता. परंतु त्याच स्थायी समितीच्या बैठकीत जी दक्षिण आणि एफ दक्षिण विभाग, ज्या ठिकाणचे आमदार शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच शिवसेना आमदार अजय चौधरी आहेत, तेथील पदपथांच्या सुधारणांचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवल्यामुळे शिवसेनेची बदनामी कोण करते आणि कोणत्या कारणांसाठी हा प्रस्ताव राखून ठेवला याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपने तर शिवसेनेची भूमिका दुतोंडीपणाची असल्याचा आरोप करत कोणत्या अर्थपूर्ण कारणांसाठी हा प्रस्ताव राखून ठेवला असा सवाल केला आहे.
१४ रस्त्यांच्या पदपथांची सुधारणा करण्याचा होता प्रस्ताव
स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षांनी ३९ रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर करताना एफ दक्षिण, जी दक्षिण विभागाचा प्रस्ताव राखून ठेवला. वरळी, लोअरपरळ, लालबाग, परेल आदी भागांमधील पदपथांचे मजबूती करण तसेच सुधारणा करण्याचा हा प्रस्ताव होता. १४ रस्त्यांच्या पदपथांची सुधारणा करण्याचा हा प्रस्ताव होता. तब्बल २७ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव सोमवारच्या बैठकीत रस्ते कामांच्या प्रस्तावांसह मंजूर व्हायला हवा होता. परंतु त्यांनी तो मंजूर न करता राखून ठेवला. रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव यापूर्वीच्या कामांची माहिती सादर करण्यासाठी जेव्हा राखून ठेवण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी केली होती, तेव्हा ते राजकारण करत असून हे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे अशी मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षातील सदस्यांनी केली होती. परंतु भाजपने मागणी केली तर राजकारण आणि शिवसेनेने जेव्हा राखून ठेवला ते काय म्हणायचे असा सवाल आता उपस्थित होत आहे.
संशयाचे धुके स्थायी समिती अध्यक्षांच्या भोवती दाटले
रस्ते पदपथाचा हा प्रस्ताव अर्थपूर्ण कारणांसाठीच मागे ठेवला असून यातून त्यांचा दुतोंडीपणा दिसून आल्याचा आरोप करत तब्बल २७ कोटींचा प्रस्ताव विचारात का घेतला नाही? असा सवाल भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. जी दक्षिण विभागात शिवसेनेचे युवा नेते नेतृत्व करत आहेत. इतर सर्व प्रस्ताव मंजूर होत असताना हा प्रस्ताव नेमका मागे का ठेवला गेला याबाबत संशयाचे धुके स्थायी समिती अध्यक्षांच्या भोवती दाटले आहे. त्यांनी याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे असे परखड मत गटनेते शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपची गरज नसून त्यांच्या पक्षातीलच नेते पुरेसे आहेत, असाही टोला शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.
(हेही वाचा – महापौर कार्यालय! मुक्काम पोस्ट राणीबाग निवासस्थान की महापालिका मुख्यालय?)
भाजपाच्या नगरसेवकांनी रस्त्यांचे विषय ‘नॉट टेकन’ करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेची बदनामी होते असा कांगावा करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आता हा विषय ‘नॉट टेकन’ झाल्यावर स्थायी समिती अध्यक्षांनी शिवसेनेची बदनामी केली का? याचे उत्तर द्यावे. तसेच या प्रस्तावाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे स्थायी समिती अध्यक्षांनी मुंबईकरांना दिली पाहिजेत असे प्रतिपादन गटनेते शिंदे यांनी केले.
Join Our WhatsApp Community