मालाड-दिडोंशी येथील म्हाडाच्या ताब्यातील खेळाच्या मैदानावर आता शिवसेनेचाच डोळा असून, याठिकाणी खासदार निधीतून समाजकल्याण केंद्राची उभारणी केली आहे. या समाजकल्याण केंद्राच्या बांधकामाच्या माध्यमातून मैदानच हडपण्याचा डाव आहे. त्यामुळे मागील चाळीस वर्षांपासून ज्या मोकळ्या जागेची देखभाल करत स्थानिक मुलांना खेळण्याची जागा उपलब्ध करुन दिली, आता तीच मोकळी जागा वाचवण्यासाठी स्थानिकांना संघर्ष करावा लागत आहे. स्थानिकांचा तीव्र विरोध असतानाही शिवसेनेचे खासदार मात्र, हे बांधकाम करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेला हे मैदान लाटून कुणाचे ‘समाजल्याण’ करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
४० वर्ष जुन्या मैदानावर अतिक्रमण
मालाड पूर्व दिडोंशी येथील ऑबेरॉय मॉल आणि अदानी इलेक्ट्रीसिटीच्या जवळ असलेला सीटीएस क्रमांक ११० हा मनोरंजन मैदानासाठी राखीव भूखंड आहे. हा भूखंड म्हाडाच्या ताब्यात असून सुमारे १५०० चौरस मीटरच्या या मोकळ्या भूखंडावर जेव्हा जंगल होते, तेव्हा स्थानिकांनी ४० वर्षांपूर्वी ते साफ करुन खेळाच्या मैदानासाठी त्याचा वापर केला. मात्र, तेव्हापासून या मोकळ्या जागेवर एकही अतिक्रमण होऊ न देता, ते मैदान विभागातील तरुण मुलांना खेळण्यासाठी राहील याची विशेष काळजी येथील सन्मित्र क्रीडा मंडळ, दिंडोशी नगर कॉलनी युनियन आणि म्हाडा वसाहत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
(हेही वाचाः स्थायी समितीची बैठक झूमद्वारे घेण्यास सर्व पक्षांचा विरोध!)
स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी
विशेष म्हणजे या संपूर्ण परिसराच्या ३ किलोमीटर परिसरात एकही खेळाचे मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे या खेळाच्या मैदानावर पठाणवाडी, विटभट्टी, मकबूक कंपाऊंडसह दिंडोशीतील स्थानिक मुले खेळत असतात. या संपूर्ण विभागातील मुलांना हे मैदान अपुरे पडत असतानाच, आता या मैदानाच्या जागेवर म्हाडाच्या माध्यमातून खासदार निधीतून समाजकल्याण केंद्राचे बांधकाम केले जात आहे. सुमारे दोन हजार चौरस फुटाच्या जागेवर हे बांधकाम केले जाणार असून, याला स्थानिक रहिवाशांचा तसेच मुलांचाही तीव्र विरोध आहे. हे मैदान बचावासाठी आता रहिवाशी रस्त्यांवर उतरले आहेत. त्यामुळे लोकांच्या विरेाधानंतर खासदारांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असले, तरी १३ एप्रिल रोजी अचानकपणे म्हाडाच्या माध्यमातून होणाऱ्या समाज कल्याण केंद्राच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आटोपून घेण्यात आला. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
भजनी मंडळाला जागा देण्याचा घाट
स्थानिक सन्मित्र क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा सिध्दकला भजनी मंडळाला देण्याचा घाट आहे. त्याकरताच या समाजकल्याण केंद्राचं बांधकाम होत आहे. पण त्यासाठी ही जागा योग्य नसून त्यांना ज्या गणपती मंदिरात ते भजन करतात, तिथेच जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ही संस्था आपला हट्ट काही सोडत नाही. मैदानाच्या जागेवर जिथे मुलाच्या खेळण्यामुळे गोंगाट निर्माण होतो, तिथे त्यांना शांत चित्ताने मन लावून भजन आणि कीर्तन कसे करता येईल, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Communityहे मैदान जरी म्हाडाच्या ताब्यात असले तरी या मैदानाच्या सुशोभिकरणावर यापूर्वी तत्कालीन नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी आपल्या नगरसेवक निधीतून ६० रुपये खर्च केले होते. तसेच मी माझ्या नगरसेवक निधीतून येथील ट्रॅक दुरुस्तीचीही कामे केली आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तर महापालिकेने मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घ्यायला हवा. राहीला मुद्दा यावरील समाजकल्याण केंद्राच्या बांधकामाचा. तर यावर कोणतेही बांधकाम होऊ नये. ही जागा मुलांना निव्वळ आणि निव्वळ खेळासाठीच राहायला हवी. ही जागा कुणाला देणार हा मुद्दा नंतरचा. पण ज्या संस्थेला देणार आहे, त्यांना आमचा विरोध नाही. सत्संगाकरता आम्ही विरेाध करणार नाही. पण त्यासाठी मैदानाच्या जागेवर बांधकाम करुन देणे योग्य नाही. त्यापेक्षा विभागातील अन्य समाजकल्याण केंद्रांचा शोध घेऊन तिथे त्यांना जागा देता येईल. पण मोकळी मैदाने ही शहराची फुफ्फुसे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या. त्यावर समाजकल्याण केंद्रंच काय, तर कोणतेही बांधकाम करू नये, त्याला आमचा विरोध आहे.
-संगीता ज्ञानमूर्ती शर्मा, स्थानिक भाजप नगरसेविका